मुंबई, ता.24 - अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. राज्य सरकारने आतापर्यंत 31 लाख 64 हजार शेतकऱ्यांना 2हजार 215 कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे.यापैकी 1 हजार 829 कोटी रुपये जिल्हा स्तरावर वितरीत करण्यात आले आहे.अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता.23) दिली. पालकमंत्र्यांना पूरग्रस्त भागाचा दौरा करण्याचे निर्देशही देण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
राज्य सरकारने पूरग्रस्त भागात तातडीच्या मदतीसाठी यंत्रणा युध्दपातळीवर कार्यरत केली आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून घरे,शेती आणि जनावरांचे जिथे नुकसान झाले आहे तिथे आवश्यक त्या ठिकाणी निकषामध्ये शिथिलता आणून मदत केली जाईल असेही फडणवीस यांनी सांगितले. पूरग्रस्त भागातील पंचनामे पूर्ण होताच तातडीने मदत पोहोचवली जात आहे. ज्या तालुक्याचे पूर्ण होतात ,तिथे त्वरित आर्थिक सहाय्य वितरीत केले जाते.एकत्रित शासन आदेशाची वाट न पाहता पंचनामे येतील तसे शासन निर्णय काढण्यात येत आहेत.मदत कार्य कुठेही थांबलेले नाही.मृत्यू, जनावरांचे नुकसान,घरांचे नुकसान या सारख्या दुर्दैवी घटनांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने मदत वितरीत करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. स्थानिक पातळीवरही नुकसानग्रस्तांना त्वरित दिलासा देण्यासाठी प्रशासनाला सूट देण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री आज अतिवृष्टी भागाच्या दौऱ्यावर
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अतिवृष्टी आणि पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुरस्थितीग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत.तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज धाराशिव जिल्ह्याचा दौरा करून पूरग्रस्त गावांना भेट देणार आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर 24 आणि 25 सप्टेंबरला पुणे जिल्ह्यातील खडकवासला येथील जनसंवादाचा नियोजित कार्यक्रम पुढे ढकलला आहे.
.
0 Comments