वैजापूर, ता.16 - मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू असताना दुबार, स्थलांतरित व मयत मतदारांच्या नावांच्या समस्या कायम आहे. वैजापूर विधानसभा मतदारसंघात 12 हजार 79 दुबार मतदा आढळून आले आहेत.
दोनपैकी एक नांव कमी करण्यासाठी बी एल ओ घरोघर जाणार आहे. त्यानुसार, 353 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची (बीएलओ) नियुक्ती करण्यात आली असून गेल्या काही दिवसांपासून दुबार नावे असलेल्या मतदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. जवळपास 9 हजार नोटिसा वितरीत झालेल्या आहेत. नोटीस बजावण्यात आलेल्या नागरिकांनी समक्ष उपस्थित राहणे गरजेचे आहे. दोनपैकी कोणते नाव कायम ठेवून कोणते वगळायचे हे त्यांनी लेखी स्वरूपात द्यायचे आहे. त्यानुसार, पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
मतदार यादीत दोन ठिकाणी नाव असणे गुन्हा असून तसे करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. असा इशारा तहसील कार्यालयाने दिला आहे. शहरी भागात मोठय़ा संख्येने दुबार मतदार आढळून आले आहेत. निवडणुकीत उत्साही मंडळी भरमसाठ नावे नोंदवून घेतात. तीच नावे पुढे कायम राहतात. त्यातून दुबार नावांची समस्या तयार होते, असे अधिकारी सांगतात.
यादीत आपले नाव आहे की नाही, हे मतदारांनी तपासून पाहावे. नांव नसल्यास त्याचा दोष यंत्रणेला देता येणार नाही, असेही तहसील कार्यालयाने स्पष्ट केले आहे. मोठय़ा प्रमाणात असलेल्या स्थलांतरित मतदारांनी स्वतःहून अर्ज करावेत, त्याचप्रमाणे मयत व्यक्तींची नावे संबंधित कुटुंबीयांनी कळवणे आवश्यक आहे. मतदार यादी अद्ययावत व निर्दोष करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन तहसील कार्यालयाने केले आहे.
0 Comments