वैजापूर, ता.17 - वैजापूर शहरातील गजबजलेल्या म्हसोबा चौकात मंगळवारी (ता.17) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ट्रक, हायवा ट्रक व पिक अप रिक्षा यांच्यात विचित्र अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी रिक्षा चालकासह दोन ते तीन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी त्वरित खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ट्रॅकचालक पसार झाल्याचे समोर येत असून जखमीची नावे लगेच कळू शकली नाहीत.
अपघाताच्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या फळ वं भाजीपाला विक्रेत्यांचा माल रस्त्यावर सांडल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले तसेच एका दुचाकीचाही चुराडा झाला.
या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वैजापूर छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर म्हसोबा चौक हे अतिशय गजबजलेले ठिकाण असून येथून भरधावं वेगाने वाहनांची वर्दळ सुरु असते. मंगळवारी याच भागात एक हायवा ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रकने अगोदर त्याच दिशेने जाणाऱ्या पिकअप रिक्षाला धक्का दिल्याने ही रिक्षा रस्त्यावरील दुभाजकावर चढली. त्यानंतर या ट्रकने कडेला उभ्या असलेल्या हायवाला जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती कि हायवा काही फूट अंतर पुढे ढकलला जाऊन तो फळ व भाजीपाला विक्रेत्याच्या दुकानाला भिडला. तेथील लोकांनी तातडीने पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला. भाजीपाला व फळ रस्त्यावर पडल्याने मोठे नुकसान झाले व एका दुचाकीचेही नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आढावा घेतला. म्हसोबा चौकात भरधावं वेगाने वाहने चालवली जात असल्याने काही दिवसांपासून अपघाताचे प्रमाण वाढल्याने पोलिसांनी लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
0 Comments