वैजापूर, ता .16 - दुय्यम न्यायालयातील कर्मचा-यांना देखील उच्च न्यायालयातील कर्मचा-यांप्रमाणेच वेतनवाढ देण्यात यावी यासाठीचा प्रस्ताव शासन स्तरावर दोन वर्षांपासून प्रलंबित असून त्यासंदर्भात शासनाकडून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही.* त्या निषेधार्थ शुक्रवारी (ता.16) वैजापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय वरीष्ठ स्तर या न्यायालयातील कर्मचा-यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले व शासनाचा निषेध नोंदविला
राज्यातील दुय्यम न्यायालयांतील कर्मचा-यांच्या मागील दोन वर्षांपासून प्रलंबित मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी "महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघा"च्या वतीने हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या या मागणीस शासनाने सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास येत्या ५ नोव्हेंबर रोजी सामूहिक रजा तसेच ६ व ७ नोव्हेंबर रोजी अन्नत्याग आंदोलन आणि त्यानंतर १७ नोव्हेंबर पासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. कर्मचा-यांच्या या आंदोलनास वैजापूर वकील संघाने देखील पाठींबा दिला असून या आंदोलनात सर्व न्यायालयीन कर्मचारी मोठया संख्येने सहभागी झाले होते.
0 Comments