तालुक्यात केवळ 4051 हेक्टर क्षेत्रावरच पेरणी ...
वैजापूर, ता.28 - शहर व परिसरात आज सायंकाळी जोरदार पाऊस झाला.पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी या पावसामुळे सुखावला असून खोळंबलेल्या पेरण्यांना आता वेग येणार आहे.
पावसाळा सुरू होऊन जवळपास एक महिना उलटला असला तरी अद्याप समाधानकारक व पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत होता. तालुक्यात केवळ पाच टक्के क्षेत्रावरच खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. उर्वरित बहुतांश शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असल्याने शेतजमिनी अजूनही ओस पडल्या आहेत.
तालुक्यात एकूण एक लाख 35 हजार हेक्टर क्षेत्र खरीप पेरणीसाठी योग्य असून दरवर्षी या काळात मोठ्या प्रमाणात पेरण्या पूर्ण झालेल्या असतात. मात्र यंदा पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे नियोजन विस्कळीत झाले होते. काही भागांत हलका पाऊस झाला असला तरी तो पेरणीसाठी पुरेसा नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय पुढे ढकलला आहे. ज्या शेतकऱ्यांनी धाडस करून पेरणी केली आहे, त्यांनाही उगवण टिकून राहण्यासाठी आणखी पावसाची गरज आहे. सध्या तालुक्यात फक्त 4051 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
तालुक्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान 550 मिलिमीटर इतके आहे. विशेष म्हणजे मागील सलग पाच वर्षांत तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. त्यामुळे यंदाही चांगल्या पावसाची अपेक्षा होती. मात्र पावसाने अपेक्षाभंग केल्याने शेतकऱ्यांसह कृषी विभागाचीही चिंता वाढली होती.
कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करण्याचा सल्ला दिला आहे. घाईघाईने पेरणी केल्यास बियाण्यांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले असून येत्या काही दिवसांत जोरदार पाऊस झाल्यास खरीप हंगामाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पावसाचा विलंब कायम राहिल्यास खरीप उत्पादनावर परिणाम होण्याची तसेच शेतीचे आर्थिक गणित बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
0 Comments