news today, दिंडोरीत मोटार विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू

स्नेसंमेलन आटोपून घरी निघालेल्या दरगोडे कुटुंबियांवर काळाचा घाला ; मृतात सहा बालकांचा समावेश ...

नाशिक, ता.05 - खासगी शिकवणीचे स्नेहसंमेलन आटोपून घरी निघालेल्या कुटुंबीयांची मोटार रस्त्यातील विहिरीत कोसळल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला. शुक्रवारी (ता.03) रात्री दिंडोरी येथे ही घटना घडली. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील सहा बालकांसह पालकांचा समावेश आहे.

     अपघातात मृत पावलेले दरगोडे कुटुंबातील सदस्य 

कॉलनी रस्त्याच्या मध्यभागी ही विहीर आहे. विहिरीच्या कठड्याची उंची एक फुटापेक्षा कमी असून सिमेंटचा रस्ता थेट विहिरीपर्यंत गेलेला आहे.हीच बाब अपघातास कारणीभूत ठरल्याचे मानले जाते. यावर प्रचंड रोष निर्माण झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने विहिर बुजविण्याचे काम सुरू केले. दिंडोरीतील शिवाजीनगर हा निवासी वसाहत आणि आसपास शेती असणारा परिसर आहे. येथील राजे    बँक्वेट हॉल आणि मंगल कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी एका खासगी शिकवणीतर्फे स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी दिंडोरी शहरासह आसपासच्या गावांतील विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
रात्री दहाला स्नेहसंमेलन संपल्यानंतर इंदोरे येथील दरगोडे कुटुंबीय मोटारीने घरी जाण्यासाठी निघाले . कॉलनी रस्त्याने रस्त्याने भरधाव जात असताना रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या विहिरीत त्यांची मोटार कोसळली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या सहाय्याने क्रेंनद्वारे रात्री एकच्या सुमारास मोटार विहिरीतून काढण्यात आली. 
या अपघातात सुनील दरगोडे (32 वर्ष), रेश्मा दरगोडे (27 वर्ष), आशा दरगोडे (32 वर्ष), गुणवंती दरगोडे (11 वर्ष), श्रेयस दरगोडे (11 वर्ष), श्रावणी दरगोडे (11 वर्ष), सृष्टी दरगोडे (14 वर्ष), समृध्दी दरगोडे (7 वर्ष) आणि श्रद्धा दरगोडे (13 वर्ष) या नऊ जणांचा मृत्यू झाला. हे सर्व इंदोरे येथील रहिवासी असून सर्व मुले एकमेकांचे भाऊ - बहीण आहेत.
याप्रकरणी मृत वाहनचालक सुनील दरगोडे यांच्यासह विहीर मालक राजेंद्र राजे या दोघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments