news today, पोलीस व वाळू माफियांच्या मारहाणीत शिक्षकाचा मृत्यू वैजापूर पोलिसांची विभागीय चौकशी होणार

वैजापूर, ता.13 -  पोलीस आणि वाळू माफियांच्या मारहाणीत सुरेश बोरसे या शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता.10) वेरूळ येथे घडली असून, या प्रकरणी रत्नपूर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपीच्या शोधात वेरूळ येथे गेलेल्या वैजापूर पोलिसांची विभागीय चौकशी करण्यात येईल असे छत्रपती संभाजीनगर जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी सांगितले. 

 शिक्षक सुरेश बोरसे यांच्या मृत्यू प्रकरणी संबंधित पोलीस   व वाळू माफियांविरुढ गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल पाच तास रास्ता रोको करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूर तालुक्यातील धोंदलगांव येथील संदीप माधव आवारे आणि रवींद्र रखमाजी आवारे यांच्यात संपत्तीवरून वाद आहे. या वादातून काही दिवसांपूर्वी रवींद्र आवारे यास जिवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली होती. तर तिसरा आरोपी संदीप आवारे हा फरार होता. संदीप हा वेरूळ येथे लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर वैजापूर पोलीस ठाण्याचे फौजदार एकनाथ नागरगोजे व कॉन्स्टेबल वाल्मीक बनगे हे बुधवारी रात्री वेरूळला गेले.त्यांच्यासोबत फिर्यादी रवींद्र आवारे याच्यासह आणखी पाच सहा जण होते. 

आरोपी संदीप आवारे हा कौशिकी गल्लीत नातलगाकडे लपून बसल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. संदीपला पकडण्यासाठी साध्या वेशात आलेले पोलीस मध्यरात्रीच्या सुमारास अचानक एका घरात घुसले. अनोळखी माणसे घुसल्याचे पाहून घरातील लोकांनी आरडाओरड केली. ही आरडाओरड पाहून घराकडे निघालेले शिक्षक सुरेश बोरसे यांनी 'तुम्ही कोण आहात ? अशी विचारणा केली. त्यावर आम्ही पोलीस आहोत असे उर्मट उत्तर देण्यात आले. ' साध्या वेशात आहात, खासगी गाडीने आलात, तुमच्या सोबत स्थानिक पोलीस नाहीत. तुम्ही नकली पोलीस तर नाहीत, तुमचे ओळखपत्र दाखवा.असे खडे बोल बोरसे यांनी सुनावले. त्यामुळे बिथरलेल्या पोलीस आणि त्यांच्यासोबत आलेल्या वाळू माफियांनी बोरसे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.जीव वाचवण्यासाठी बोरसे घराकडे पळाले, पण या टोळक्याने बोरसे यांना पकडुन फरफटत आणले आणि गाडीत कोंबून त्यांना लाथाबुक्क्यांनी तुडवले.

सुरेश बोरसे यांना मारहाण होत असल्याचे कळताच त्यांची पत्नी अनिता आणि दोन्ही मुली घटनास्थळी धावत आल्या. त्यांनी बोरसे यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला. परंतू बेभान झालेल्या पोलीस व वाळूमाफियानी त्यांना दाद दिली नाही. बोरसे यांना खाली पाडून त्यांच्या छातीवर लाथाबुक्क्या घालण्यात आल्या. बेदम मारहाणीमुळे बोरसे हे अर्धमेले झाले. या टोळक्याने त्याच अवस्थेत त्यांना गाडीत कोंबले आणि पळून जाण्याच्या बेतात असतानाच बोरसे यांची मुलगी गाडीपुढे आडवी झाली.'माझ्या वडिलांना कुठे घेऊन चाललाय' असा जाब तिने विचारला. हा प्रकार सुरू असताना तेथे लोक जमा झाले. प्रकरण अंगाशी येत असल्याचे पाहून बोरसे यांना तेथेच टाकून पोलीस व वाळू माफिया पळून गेले.

बेदम मारहाणीमुळे बोरसे हे बेशुध्द झाले होते. त्याच अवस्थेत त्यांना वेरूळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. तपासून डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

कारवाईसाठी पाच तास रास्ता रोको ...

पोलिस आणि वाळूमाफियांच्या मारहाणीत शिक्षक सुरेश बोरसे यांचा मृत्यू झाल्याचे कळताच संतापाची लाट उसळली. घाटी रुग्णालयातून बोरसे यांचा मृतदेह येताच ग्रामस्थांनी धुळे महामार्गावर ठाण मांडून पोलीस आणि वाळूमाफियावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र, पोलिसांनी बोरसे यांचा मृत्यू मारहाणीने नाहीतर हृदयविकाराने झाल्याचा दावा करत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. यामुळे वातावरण अधिकच चिघळले. या घटनेची माहिती कळताच शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी वेरूळ गाठले आणि रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले. या प्रकरणात दोषी पोलीस आणि वाळूमाफियावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल पाच तास रास्ता रोको करण्यात आला. त्यानंतर रात्री उशिरा अनोळखी व्यक्तीविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला.



Post a Comment

0 Comments