news today, खिडकीचे गज तोडून 1 लाख 97 हजाराचा ऐवज चोरी ; नागपूर - मुंबई महामार्गावरील घटना

वैजापूर, ता.24 - मंगळवारी शहरात चोरीची मोठी घटना समोर आली आहे. शहरातून जाणाऱ्या नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेल व्यावसायिकाच्या घरात मोठी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री घराच्या खिडकीचे गज तोडून आत प्रवेश केला आणि रोख रक्कम तसेच सोने-चांदीचे दागिने असा एकूण 1 लाख 97 हजार रुपयांचा ऐवज लंपास करून त्याच घराच्या मुख्य दरवाजातून पसार झाले. मंगळवारी पहाटे ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल आराध्याचे संचालक सुरेश मापारी हे सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे कुटुंबासमवेत जेवण करून घरी विश्रांती घेत होते. रात्री सुमारे पावणे बारा वाजेपर्यंत घरातील सर्व सदस्य झोपले होते. याच दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराला लक्ष्य केले. चोरट्यांनी प्रथम घराच्या खिडकीचे गज तोडले आणि त्याच मार्गाने घरात प्रवेश करून संपूर्ण घराची झडती घेतली.

चोरट्यांनी घरातील कपाटे, पर्स आणि इतर साहित्याची उलथापालथ केली. चोरीदरम्यान घरातील सामान पूर्णपणे अस्ताव्यस्त करण्यात आले. मौल्यवान वस्तूंवर डोळा ठेवत त्यांनी चोरी केली आणि त्यानंतर मुख्य दरवाजातून बाहेर पडून पलायन केले.

मंगळवारी पहाटे सुमारे पावणे चार वाजता सुरेश मापारी यांच्या वडिलांना जाग आली. त्यावेळी घराचा मुख्य दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने त्यांनी पाहणी केली असता खिडकीचे गज तुटलेले आणि घरातील साहित्य विखुरलेले दिसून आले. त्यानंतर त्यांनी कुटुंबातील इतर सदस्यांना उठवून संपूर्ण घराची तपासणी केली असता चोरी झाल्याचे स्पष्ट झाले.

तपासणीदरम्यान घरातील पर्समधून 70 हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याचे आढळले. याशिवाय चोरट्यांनी सोने-चांदीचे अनेक दागिनेही लंपास केले. चोरीस गेलेल्या ऐवजात सुमारे 7 तोळ्यांची पोत, 14 तोळ्यांची माळ, 9 तोळ्यांचे झुमके, 9 तोळ्यांची गंठण तसेच इतर दागिन्यांचा समावेश आहे. चोरीस गेलेल्या रोख रक्कम व दागिन्यांची एकूण किंमत सुमारे 1 लाख 97 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिस अधिकाऱ्यांनी पंचनामा करून घटनास्थळाची पाहणी केली. तसेच न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) पथकानेही घटनास्थळी भेट देत विविध पुरावे संकलित केले. घराच्या परिसरातील संशयास्पद खुणा व अन्य तांत्रिक पुराव्यांची तपासणी करण्यात आली असून, चोरट्यांचा माग काढण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments