वैजापूर, ता.23 - वैजापूर पंचायत समिती परिसरातील एचडीएफसी बँकेच्या एटीएम समोर उभ्या असलेल्या स्कुटीच्या डिक्कीतून 1 लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना मंगळवारी (ता.23) दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास घडली. दोन संशयित सीसीटिव्हीत कैद झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैजापूर कांदा मार्केटमधील सुपर ट्रेडिंग कंपनी येथे मॅनेजर म्हणून काम पाहणारे सलीम अब्दुलहक शेख (रा.दर्गाबेस वैजापूर) हे कांदा खरेदीसाठी रक्कम कमी असल्याने दुपारी दीडच्या सुमारास वैजापूर पंचायत समिती समोरील एचडीएफसी बँकेत पैसे काढण्यासाठी आले होते. बँकेतून 14 लाख 50 हजार रुपये त्यांनी काढले व रक्कम मोजून स्कुटीच्या सीटखाली डिक्कीमध्ये ठेवली व जाण्यासाठी निघाले असता दुसऱ्या खात्यातून आणखी 50 हजार रुपये काढायचे राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी स्कुटी एटीएम समोर पार्क करून पैसे काढण्यासाठी गेले. एटीएममधून पैसे काढून लगेच ते स्कुटीने कांदा मार्केटला गेले. तेथे गेल्यावर रक्कम मोजली असता त्यामध्ये 1 लाख रुपये कमी भरले.
पैसे काढण्यासाठी एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये गेल्यावर कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी स्कुटीच्या डिक्कीतून 1लाख रुपयाचे बंडल लंपास केले. या प्रकरणी सलीम अब्दुलहक शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुध्द पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन संशयित सीसीटीव्हीत कैद झाले असून पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल रामचंद्र जाधव हे अधिक तपास करीत आहेत.
0 Comments