news today ध्येय, नियोजन आणि चिकाटी हाच यशाचा मंत्र - जिल्हाधिकारी विनय गोंडा

राजपूत भामटा सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शिष्यवृत्ती वितरण 
 
 छत्रपती संभाजीनगर, ता.20 - मोठे ध्येय, त्यासाठी अचूक नियोजन, अविरत परिश्रम आणि अढळ चिकाटी यांच्या बळावरच यशाचे शिखर गाठता येते. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून त्यांना कृतीची जोड द्यावी. यशासाठी पालकांचे प्रोत्साहन, योग्य संस्कार आणि सातत्यपूर्ण पाठबळ अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विनय गोंडा यांनी केले.

राजपूत भामटा सामाजिक प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने एम.जी.एम. परिसरातील रुक्मिणी सभागृहात आयोजित 'गुणवंत, यशवंतांचा सत्कार व शिष्यवृत्ती वितरण सोहळा–२०२६' प्रसंगी ते मार्गदर्शन करत होते. 
पुढे बोलताना विनय गोंडा म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्वतःचे ध्येय निश्चित करून त्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे. अपयशाला घाबरून न जाता त्यातून शिकण्याची वृत्ती जोपासावी. स्पर्धा परीक्षांमध्ये व विविध क्षेत्रांत यश संपादन केलेल्या कर्तृत्ववान अधिकारी आणि व्यक्तींना आदर्श मानून प्रत्येक विद्यार्थ्याने आत्मविश्वासाने आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करावी.
अध्यक्षस्थानी बहुरे ग्रुपचे रामसिंग बहुरे होते. प्रमुख अतिथी म्हणून अप्पर पोलीस उपायुक्त खिशालसिंग परदेशी, संतोष राजपूत, भगवानसिंग डोभाळ, निर्मला परदेशी व भागवत बिघोत यांची उपस्थिती लाभली.

यावेळी दहावी, बारावी, विविध स्पर्धा परीक्षा तसेच शासकीय, खासगी, शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक आणि अन्य क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सुमारे 200 गुणवंत विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रतिष्ठानतर्फे दहावीतील पाच आणि बारावीतील पाच अशा एकूण दहा गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी रुपये 5000 ची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. गुणवंतांचा गौरव आणि शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक बळ देण्याच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष स्वागत केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष महेर व महेंद्र बारवाल यांनी केले, तर आभार युवराज बहुरे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. सुमारे 200 गुणवंतांचा सत्कार आणि 10 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करून शिक्षण, गुणवत्ता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा हा भव्य सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात दिमाखात संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments