राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाची निवेदनाद्वरे मुख्यमंत्र्यांकडे मागणी
छत्रपती संभाजीनगर, ता .22 - महाराष्ट्राच्या प्रगतीला नवी दिशा देणाऱ्या पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावरील महत्त्वाकांक्षी 'मिसिंग लिंक' (Missing Link) प्रकल्पास "लोकनेते स्व.अजितदादा पवार मिसिंग लिंक" असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने छत्रपती संभाजीनगर येथील मुख्यमंत्री सहायता कक्षामार्फत निवेदन देऊन करण्यात आली.
दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) साकारलेला 'मिसिंग लिंक' प्रकल्प हा आधुनिक अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना असून अत्याधुनिक तंपत्रज्ञान, लांब बोगदे, उंच व्हायाडक्ट आणि आधुनिक सुरक्षा व्यवस्थेमुळे हा देशातील सर्वात महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांपैकी एक मानला जात आहे. या प्रकल्पामुळे पुणे–मुंबई प्रवासाचा कालावधी कमी होणार असून घाट विभागातील वाहतूक कोंडी, अपघातांचे प्रमाण आणि इंधनाचा अपव्यय मोठ्या प्रमाणात घटणार आहे. तसेच उद्योग, व्यापार, पर्यटन, शेती आणि राज्याच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
यामध्ये पुढे नमूद करण्यात आले आहे की, लोकनेते स्व. अजितदादा पवार यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात वित्त, नियोजन, जलसंपदा, सहकार, कृषी, ऊर्जा आणि विशेषतः पायाभूत सुविधांच्या विकासासाठी उल्लेखनीय योगदान दिले. राज्याच्या विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणे, प्रशासकीय निर्णयांना गती देणे आणि विविध विकास प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी करणे, ही त्यांची कार्यपद्धती होती.
पुणे–मुंबई 'मिसिंग लिंक' प्रकल्पाबाबतही स्व. अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र विधानसभेत वेळोवेळी सविस्तर भूमिका मांडून या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले होते. या प्रकल्पासाठी आवश्यक निधी, प्रशासकीय मान्यता आणि कामाला गती मिळावी यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यामुळे या ऐतिहासिक प्रकल्पाच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा असल्याची भावना राज्यातील नागरिकांमध्ये असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात राज्याच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या महान व्यक्तींच्या नावाने महामार्ग, सार्वजनिक प्रकल्प व शासकीय संस्थांचे नामकरण करण्याची गौरवशाली परंपरा आहे. त्याच परंपरेनुसार पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावरील 'मिसिंग लिंक' प्रकल्पास "लोकनेते स्व. अजितदादा पवार मिसिंग लिंक" असे नाव देऊन त्यांच्या विकासाभिमुख कार्याचा गौरव करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, स्व. अजितदादा पवार यांच्या 22 जुलै रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन म्हणून या नामकरणाचा शासनाने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके, माजी सभापती एल.एम.पवार, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बागुल, आबासाहेब साळुंके, मराठवाडा कार्याध्यक्ष नितीन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments