मूळचे बीड जिल्हयातील दिंदरुड चे रहिवाशी असलेले डॉ. व्हि.जी.शिंदे हे वैद्यकीय अधिकारी म्हणून वैजापूर ग्रामीण रुग्णालयात रुजू झाले होते. त्यानंतर ते येथेच रमले. सेवानिवृत्तीनंतर ते वैजापूर येथे स्थायिक झाले. अनेक वर्ष त्यांनी निःस्वार्थपणे रुग्ण सेवा केली. सामाजिक कार्यातही ते अग्रेसर होते. नगरपालिकेचे उपाध्यक्ष, शिक्षण प्रसारक संस्था वैजापूरचे अध्यक्ष, वसंत क्लब वैजापूर चे उपाध्यक्ष आदी पदावर त्यांनी निःस्वार्थ व सेवाभावी वृत्तीने काम पाहिले. वैजापूर तालुका पाटपाणी संघर्ष समितीचेही ते अध्यक्ष होते. ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांनी कै.लालाबिंदा प्रसाद वस्तीगृह सुरू करून त्यांना मदत केली. राज्य शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलीत मित्र पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता.
काही दिवसांपूर्वी तब्येत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी मुंबई येथील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शुक्रवारी (ता.12) दुपारी त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील एशियन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचे रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.
शनिवारी (ता.13) सकाळी नऊ वाजता वैजापूर शहरातील अमरधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
0 Comments