news today, नैसर्गिक आपत्ती कामात हलगर्जीपणा ; पुरणगावचे ग्राम महसूल अधिकारी काळे निलंबित

 वैजापूर, ता.30 - कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल पुरणगाव (तालुका वैजापूर) सजाचे ग्राम महसूल अधिकारी अमोल पोपट काळे यांना उपविभागीय अधिकारी डॉ अरुण जऱ्हाड यांनी निलंबित केले आहे. नैसर्गिक आपत्ती काळात कर्तव्यात कसूर केल्याबद्दल प्रशासनाने केलेल्या या कारवाईमुळे कामचोर कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

अमोल पोपट काळे हे वैजापूर तालुक्यात पुरणगाव सजाचे ग्राम महसूल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.28 सप्टेंबरपासून वैजापूर तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने गोदावरी नदीस पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून घरे पडली आहेत. गोदावरी नदी पात्रातील पूरपरिस्थितीमुळे नारायणपूर येथे काही कुटुंब नदी प्रवाहात अडकून पडले होते. याबाबत ग्राम महसूल अधिकारी अमोल काळे यांनी प्रशासनाला कळवणे आवश्यक होते. परंतु त्यांनी कोणतीही माहिती तोंडी अथवा फोनद्वारे सांगितली नाही.
 तसेच मोजे नारायणपूर येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना मदत कार्य सुरु असताना काळे यांनी तेथे उशिरा हजेरी लावली. सजातील ग्रामस्थ व शेतकरी यांच्या काळे यांच्या विरोधात अनेक तक्रारी असल्याने प्रशासनाने वेळोवेळी काळे यांना सूचना दिल्या होत्या. मात्र त्यांच्या वर्तवणुकीत कुठलीही सुधारणा दिसून आली नाही. 
 उलट 30 सप्टेंबर रोजी खासदार, आमदार, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी नारायणपूरला भेट दिली त्यावेळीही काळे  गैरहजर असल्याचे आढळून आले. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेती पिकांचे व बाधित व्यक्तींचे घर विहीर यांचे पंचनामे करून बाधिताना शासनाची मदत देण्याबाबतचे निकष यावर पंचायत समितीच्या सभागृहात मंगळवारी बैठक व कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या बैठकीलाही ग्राम महसूल अधिकारी अमोल काळे हे पूर्वपरवानगी न घेता गैरहजर राहिले. म्हणून तहसीलदार सुनील सावंत यांनी दिलेल्या प्रस्तावनुसार उपविभागीय अधिकारी डॉ अरुण जऱ्हाड यांनी अमोल काळे यांना महाराष्ट्र नागरी सेवा व नैसर्गिक आपत्ती अधिनियमाचा भंग केल्याबद्दल निलंबित केले.

Post a Comment

0 Comments