news today, वैजापूर तालुक्यातील 125 ग्रामपंचायतींचा आरक्षण कार्यक्रम जाहीर

राजकीय हालचालींना वेग ...

वैजापूर, ता.31- डिसेंबर 2025 मध्ये मुदती संपणाऱ्या जिल्ह्यातील 633 ग्रामपंचायतींच्या सदस्यांच्या आरक्षणाचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून या प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले आहेत. 12 जून रोजी ही सोडत निश्चित केली जाणार आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर तालुक्याचे राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तालुक्यातील 105 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल वाजताच गावागावात राजकीय हालचालींना वेग आला आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनंतर आता ग्रामीण सत्तेवर कब्जा मिळवण्यासाठी मोठी लढत रंगणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर नेते, गट आणि संभाव्य उमेदवारांनी आपल्या-आपल्या गावांत मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

माहितीनुसार, डिसेंबर 2025 पर्यंत कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतींसह सन 2025 मध्ये नव्याने स्थापन झालेल्या आणि मुदतपूर्व बरखास्त करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींचाही या निवडणूक प्रक्रियेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. चहाच्या टपरीपासून चौकापर्यंत आता केवळ निवडणुकीच्या चर्चाच ऐकायला मिळत आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण 633 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये सर्वाधिक 105 ग्रामपंचायती वैजापूर तालुक्यात आहेत, तर सर्वात कमी 42 ग्रामपंचायती सोयगाव तालुक्यात आहेत. वैजापूरमध्ये इतक्या मोठ्या संख्येने निवडणुका होत असल्याने येथे राजकीय तापमान इतर तालुक्यांच्या तुलनेत अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ग्रामीण राजकारणात ग्रामपंचायत निवडणुका या प्रतिष्ठा आणि वर्चस्वाची लढाई मानल्या जातात. त्यामुळे अनेक गावांमध्ये जुने राजकीय वाद पुन्हा उफाळून येऊ लागले आहेत. काही ठिकाणी गटबाजी, आरोप-प्रत्यारोप आणि शक्तिप्रदर्शनालाही सुरुवात झाली आहे. राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता लक्षात घेता गावागावात बैठका, रात्रीच्या सभा आणि गुप्त रणनीतींचे सत्र वेगाने सुरू झाले आहे. अनेक गावांमध्ये समर्थकांमध्ये तणावाचे वातावरणही निर्माण होताना दिसत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पावसाळ्याचा काळ लक्षात घेऊन मतदान दिवाळीच्या सुमारास घेण्यात येण्याची शक्यता आहे. आरक्षणाचे चित्र स्पष्ट होताच संभाव्य उमेदवार उघडपणे मैदानात उतरतील. त्यानंतर गावागावात बॅनर, पोस्टर, मिरवणुका, बैठका आणि शक्तिप्रदर्शन पाहायला मिळू शकते. राजकीय जाणकारांच्या मते, यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुका केवळ गावच्या सत्तेपुरत्या मर्यादित राहणार नाहीत, तर आगामी मोठ्या निवडणुकांची दिशाही ठरवणार आहेत. त्यामुळे स्थानिक नेत्यांपासून मोठ्या राजकीय चेहऱ्यांपर्यंत सर्वांचे लक्ष आता वैजापूर तालुक्यातील गावांकडे लागले आहे.

सरपंच पदांचे आरक्षण निश्चित ...

गेल्या काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले होते. आता सदस्य पदांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात प्रभागरचना करण्यात आली होती.

आरक्षण प्रक्रियेचा कार्यक्रम ...

8 जून : विशेष ग्रामसभेची सूचना जाहीर होणार.
12 जून : तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा घेऊन एससी, एसटी, ओबीसी आणि महिला आरक्षणाची सोडत काढली जाईल.
17 जून : प्रभागनिहाय आरक्षण प्रारूपाला जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी.
19 जून : आरक्षण प्रारूप प्रसिद्ध केले जाईल.
19 ते 25 जून : आरक्षणावर हरकती आणि सूचना मागविण्यात येतील.
3 जुलै : उपविभागीय अधिकारी हरकतींवर निर्णय देतील.
8 जुलै : जिल्हाधिकारी अंतिम मंजुरी देतील.
10 जुलै : अंतिम प्रभाग रचना आणि आरक्षण यादी प्रसिद्ध होईल.

राज्य निवडणूक आयोगाने कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांच्या आरक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. हा कार्यक्रम राज्यातील ग्रामपंचायतीसाठी लागू आहे. यापूर्वी सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर प्रभागरचना करण्यात आली.
- सुनील सावंत, तहसीलदार, वैजापूर

Post a Comment

0 Comments