मध्यप्रदेशातील इंदूर येथे जात असताना सेंधवाजवळ कार कंटेनरला धडकली ; अपघातात दोघांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी
वैजापूर, ता.01- मध्यप्रदेशातील सेंधवा येथे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी (ता.0) सकाळी झालेल्या कार व कंटेनर चा भीषण अपघात होऊन या अपघातात महालगाव ता.वैजापूर येथील बद्रीनाथ प्रमोद नांगरे व अनिकेत अनिल काळे (रा. गंगापूर) या दोघांचा मृत्यू झाला. तर अन्य दोन जण जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूर येथील अनिकेत अनिल काळे (वय 29 वर्ष, रा. सिरजगाव ह.मु. गंगापूर), ओंकार साबणे (गंगापुर), येथील बद्रीनाथ प्रमोद नांगरे वय 26 वर्ष, रा. महालगाव, ता.वैजापूर) तसेच त्यांचा पुणे येथील मित्र भूषण हे चौघेजण कार (एम.एच.11 सी.डब्ल्यू.4644) ने मध्यप्रदेशातील इंदूरकडे जात होते. सोमवारी सकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास सेंधवा शहरापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या जामली टोल प्लाझाजवळ त्यांच्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले.अनियंत्रित झालेली कार दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या मार्गावर गेली. त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरला (यू.पी.21 डी.टी. 2996) कारची समोरासमोर जोरदार धडक बसली. धडकेची तीव्रता इतकी होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.
या भीषण अपघातात बद्रीनाथ नांगरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या अनिकेत काळे यांचा सेंधवा येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमी ओंकार साबणे व भूषण यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.दरम्यान,अपघातग्रस्त कंटेनर पोलिसांनी जप्त केला आहे.
0 Comments