वैजापूर, दि. २५ वैजापूर तालुक्यातील उत्तर डोंगराळ परिसरातील शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा चांदेश्वरी धरण प्रकल्प तातडीने कार्यान्वित करा.अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके यांनी एका निवेदनाद्वारे केली.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की वैजापूर तालुका हा अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडत असल्याने शेतकऱ्यांना पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे लागते. सन 2013 मध्ये राज्य जल आराखडा तयार करण्यात आला व 2018 मध्ये त्याचे पुनर्रचना नियोजन करण्यात आले. या दोन्ही आराखड्यांमध्ये चांदेश्वरी प्रकल्पासाठी 2.3 दलघमी पाणी उपलब्ध आहे असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. तथापि, संबंधित विभागाकडून पाणी उपलब्धतेबाबत स्पष्ट निर्णय न झाल्यामुळे हा महत्त्वपूर्ण प्रकल्प आजतागायत रखडलेला आहे.
आपल्या दूरदृष्टी मुळे वैजापूर तालुक्यातील मन्याड प्रकल्प 2007 मध्ये पूर्ण होऊन शकला. हा प्रकल्प पूर्ण व्हावा म्हणून मन्याड प्रकल्प संघर्ष समितीच्या माध्यमातून आपल्या कडे पाठ पुरवठा करण्यात आला होता. हा प्रकल्प पूर्ण झाल्यापासून दरवर्षी 100 टक्के क्षमतेने भरतो. त्याचा फायदा येथील शेतकऱ्यांना होत आहे. मन्याड प्रकल्प प्रमाणे या भागातील शेतकरी व तरुणांन सोबत चर्चा करून चांदेश्वरी प्रकल्प संघर्ष समितीची स्थापना करण्यात येणार असून या प्रकल्पासाठी जन आंदोलन उभे करून असे शेळके यांनी सांगितले.
वैजापूर तालुक्यातील उत्तर डोंगराळ भागातील शेतकरीहितासाठी चांदेश्वरी प्रकल्प तातडीने मंजूर करून प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी आपण लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी श्री शेळके यांनी केली आहे. या प्रसंगी आबासाहेब साळुंके, प्रकाश शिंदे आदी उपस्थित होते.
0 Comments