प्रचारचा धुराळा थांबला, शनिवारी मतदान
वैजापूर, ता . 06 - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेला प्रचाराचा धुरळा अखेर गुरुवारी सायंकाळी सहा वाजता शांत झाला. या कालावधीत शिवसेना–भाजपमधील ‘उचलटाक’, उमेदवारांची कसरत, नेत्यांची धावपळीमुळे संपूर्ण ग्रामीण भाग ढवळून निघाला. उमेदवारांनी जिवाचे रान करीत प्रचारात कसलीही कसर सोडली नाही. मात्र, अखेर कोण कुणाला ‘धोबीपछाड’ देणार ? याचा फैसला आता 7 फेब्रुवारी रोजी मतदानातूनच होणार आहे.
तालुक्यातील बोरसर, शिऊर, वांजरगाव या जिल्हा परिषद गटांसह संवदगाव व महालगाव पंचायत समिती गणांतील लढती अत्यंत चुरशीच्या व घासून होणाऱ्या असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या मतदारसंघांकडे लागले आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात उमेदवारांनी मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला. घराघरांत भेटीगाठी, तारेवरची कसरत आणि नेत्यांच्या प्रचारसभांनी वातावरण तापले होते. प्रचार थांबताच आता उमेदवारांकडून आकडेमोड सुरू झाली असून, कोण किती खोल पाण्यात आहे? याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
तालुक्यातील बोरसर जिल्हा परिषद गटात सर्वाधिक सात उमेदवार रिंगणात असून, शिऊर, घायगाव व लासूरगाव गटात प्रत्येकी तीन उमेदवार निवडणूक लढवत आहेत. विशेषतः वांजरगाव गटात शिवसेनेचे बाबासाहेब जगताप व राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज ठोंबरे, शिऊर गटात भाजपचे सुनील पैठणपगारे व उबाठा शिवसेनेचे संजय निकम, तर बोरसर गटात शिवसेनेचे अजय पाटील चिकटगावकर आणि उबाठा शिवसेनेचे मनोज गायके यांच्यात ‘काँटे की टक्कर’ पाहायला मिळत आहे. वाकला गटातही लढत तितकीच रंगतदार असून सर्वच रणरागिणी पदर 'खोचून' मैदानात उतरल्या आहेत. या गटात बाजार समितीचे सभापती रामहरी जाधव यांच्या सहचारिणी व उपसभापती शिवकन्या पवार स्वतः निवडणूक लढवत आहेत. बोरसर गटात माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांचे पुत्र अजय पाटील चिकटगावकर हे निवडणूक आखाड्यात असल्याने या लढतीकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे. भाजप - शिवसेनेची युती असली तरी काही ठिकाणी युतीच्या उमेदवारांसमोर पुरस्कृत केलेल्या उमेदवारांनीच आव्हान उभे केले आहे. त्यामुळे निवडणुकीत कुणाची लढाई कुणासोबत? हे समजणं मतदारांना अवघड जात आहे. विशेष म्हणजे दोन्हीही अन्य पक्षांच्या उमेदवारांनाही पाठिंबा दर्शवत राजकारणाच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. दरम्यान, संवदगाव व महालगाव पंचायत समिती गणांत ‘करा किंवा मरा’ची लढाई पाहायला मिळत आहे. पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव असल्याने हे पद याच गणांतून जाणार आहे. त्यामुळे या गणांवर नेत्यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले होते.
काय घडले… काय बिघडले ?
या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे आणि भाजपचे नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांच्यातील राजकीय कलगीतुरा चांगलाच रंगला. प्रचारादरम्यान आरोप–प्रत्यारोपांच्या फैरी, चिखलफेक, पडद्याआडून सोडलेले राजकीय ‘बाण’, युतीचा उमेदवार देऊनही अपक्षांना दिलेला पाठिंबा आणि युतीला फासलेला हरताळ हे सर्व मुद्दे चर्चेचा विषय ठरले. त्यातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे बाजार समितीचे सभापती रामहरी जाधव यांच्याविरोधात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या संचालकांनी अविश्वास ठराव दाखल करत निवडणुकीआधीच राजकीय ‘स्फोट’ घडवून आणला.
अश्विनी चिकटगावकरांची माघार ...
माजी आमदार स्व. कैलास पाटील चिकटगावकर यांच्या कन्या अश्विनी पाटील या याच गटातून निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. मात्र, ऐनवेळी त्यांनी शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार पार्वताबाई जाधव यांना पाठिंबा देत निवडणूक आखाड्यातून माघार घेतली. त्यामुळे ही माघार निर्णायक टर्निंग पॉईंट ठरणार की नाही? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
0 Comments