news today, जिल्हा बँक निवडणूक समीर अब्दुल सत्तार, आ.संजना जाधव यांच्यासह 45 जणांचे अर्ज अवैध

169 जणांचे उमेदवारी अर्ज वैध. ....

छत्रपती संभाजीनगर, ता.20 - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आ.अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल समीर, आ.संजना जाधव, माजी आमदार अण्णासाहेब माने, सुहास शिरसाट यांच्यासह 45 उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी समृत जाधव यांनी अवैध ठरवले आहेत. 

जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक येत्या 4 जुलै रोजी होत असून संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी 158 उमेदवारांचे 214 अर्ज दाखल झाले होते. यातील 45 अर्ज छाननीत बाद झाले, तर 169 जणांचे अर्ज वैध ठरले. अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांनी कृषी व पणन शेतमाल प्रक्रिया मतदारसंघातून संचालक पदासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर काकासाहेब फरकाडे यांनी आक्षेप घेतला होता. सोयगाव येथील जिल्हा बँकेची शाखा इमारत अब्दुल सत्तार यांच्या मालकीच्या गट न.288 येथे असून त्यातून त्यांना भाडे मिळत आहे. ज्या संस्थेची निवडणूक लढवत आहेत त्या संस्थेचे लाभार्थी ठरल्याने अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांचा अर्ज बाद ठरविण्याबाबतचा आक्षेप ग्राहय धरण्यात आला आहे.

विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेमध्ये किमान दोन वर्षे सभासद असणे हा निकष पूर्ण करत नसल्याने आमदार संजना जाधव यांचा उमेदवारी अर्जही बाद ठरवला आहे. याशिवाय माजी आमदार अण्णासाहेब माने ज्या संस्थेचे मतदार आहेत त्या संस्थेचा 2024 -25 चा लेखा परीक्षण अहवाल '' क ' दर्जाचा असल्याने त्यांचा अर्जही अवैध ठरविण्यात आला. याच निकषनुसार अर्चना नितीन पाटील यांचा अर्ज बाद झाला. 

जिल्हा बँक आपल्याच ताब्यात राहावी म्हणून अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, काही दिग्गज नेते व त्यांच्या नातेवाईकांचे अर्ज छाननीत बाद ठरले आहेत. अर्जात त्रुटी असणे, सभासद म्हणून दोन वर्षाचा कालावधी पूर्ण नसणे, संस्थेचा ऑडिट वर्ग क असणे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे 45 जणांचे अर्ज बाद ठरले आहेत. वैयक्तिक सभासद मतदारसंघात अब्दुल जावेद यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता, तोही अर्ज बाद ठरला आहे. या मतदारसंघात एकही उमेदवार नसल्याने ही जागा रिक्त राहणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची 23 जून ही शेवटची तारीख असून त्यानंतर या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.




Post a Comment

0 Comments