news today, वैजापुरात एफडीएची कारवाई ; अतुल ट्रेड वर्ल्ड दुकानातून 1.13 लाख रुपये किंमतीचा सोयाबीन तेल जप्त

भेसळयुक्त तेल असल्याचा संशय ; ग्राहकांच्या आरोग्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

वैजापूर, ता .07 - अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गुरुवारी वैजापूर शहरातील गंगापूर रस्त्यावरील अतुल ट्रेड वर्ल्ड येथे छापा टाकून 479.4 किलो संशयित रिफाइईंड सोयाबीन तेल जप्त केले. प्राथमिक तपासात हे तेल भेसळयुक्त असल्याचा तसेच त्यावरील लेबलिंग चुकीची असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत 1 लाख 13 हजार 397 रुपये असल्याचे सांगण्यात आले. कारवाई दरम्यान ‘श्री गोल्ड’ ब्रँडचे तेल संशयास्पद परिस्थितीत आढळून आले. या प्रकरणात प्रतिष्ठान चालक अतुल पारसमल बोथरा यांचे नाव समोर आले आहे. तेलाचे नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, महिन्यांपासून नव्हे तर अनेक वर्षांपासून अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत तक्रारी होत आहेत. बाजारात विक्री होणारे तेल, मसाले, मिठाई, दूध आणि इतर खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत वेळोवेळी संशय व्यक्त केला जात होता. मात्र अन्न व औषध प्रशासनाकडून वैजापूरमध्ये फारशी मोठी किंवा प्रभावी कारवाई झाल्याचे दिसून आले नाही. आता राज्यभरात तुकाराम मुंढे यांच्या आगमनानंतर अन्नसुरक्षा मोहीम अधिक वेगाने राबवली जात असताना, वैजापूरमध्येही विभागाची सक्रियता अचानक वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये अशी चर्चा सुरू झाली आहे की, नियमित तपासण्या यापूर्वीपासूनच होत असत्या तर संशयित माल इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि इतक्या काळ बाजारात पोहोचू शकला असता का? ही कारवाई निश्चितच स्वागतार्ह आहे, मात्र त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो की, आतापर्यंत विभागाची देखरेख व्यवस्था किती प्रभावी होती? अखेर ग्राहकांच्या ताटात पोहोचणाऱ्या अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची जबाबदारी नेमकी कोणाची आहे? वैजापूरकरांची अपेक्षा आहे की, ही कारवाई केवळ एक दिवसाची औपचारिकता ठरू नये, तर भेसळखोरी आणि नियमभंगाविरोधात सातत्याने मोहीम राबविण्यात यावी. कारण प्रश्न केवळ ४७९ किलो तेलाचा नाही, तर हजारो ग्राहकांच्या आरोग्याचा आणि विश्वासाचा आहे.

कारवाई अपवादात्मक; भेसळखोरांचे फावले

विशेष म्हणजे, वैजापूर शहर आणि तालुक्यात अनेक वर्षांपासून खाद्यपदार्थांच्या भेसळीबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी होत आहेत. मात्र अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाया अपवादात्मकच राहिल्याचे चित्र आहे. परिणामी भेसळखोरांचे फावले असून ग्राहकांच्या आरोग्याशी सर्रास खेळ सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. जर नियमित तपासण्या आणि कठोर कारवाई वेळोवेळी झाली असती, तर आज अशी परिस्थिती उद्भवली असती का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

या कारवाईमुळे आणखी एक बाब समोर आली आहे की, बाजारात विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थांवर देखरेख ठेवणारी यंत्रणा नेमकी किती सतर्क आहे? एखादा छापा पडतो, काही माल जप्त होतो आणि त्यानंतर पुन्हा सर्व काही पूर्ववत सुरू राहते, अशीच परिस्थिती राहणार का? की यावेळी भेसळखोरांविरोधात कायमस्वरूपी आणि कठोर मोहिम उभारली जाणार? हजारो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असताना प्रशासनाने केवळ कारवाईची आकडेवारी मांडण्याऐवजी दोषींवर कठोर कारवाई करून जनतेचा विश्वास पुन्हा मिळवण्याची गरज असल्याची भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.

Post a Comment

0 Comments