नामका च्या हक्काच्या पाण्यावर टाकण्यात आलेल्या अन्यायकारक रिझर्व्हेशन विरोधात दाखल याचिकेवर जुलै मध्ये सुनावणी होण्याची शक्यता...
वैजापूर, ता.09 - वैजापूर - गंगापूर या कायम दुष्काळी तालुक्यासाठी असलेल्या नांदूर मधमेश्वर जलद कालव्याच्या हक्काच्या पाण्यावर नाशिक पाटबंधारे विभागाने टाकलेल्या अन्यायकारक रिझर्व्हेशन विरोधात वैजापूर मर्चंट बँकेचे चेअरमन बाळासाहेब संचेती यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर पुढील महिन्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान वैतरणा धरणातून येणा-या पाण्यापैकी किमान 4.5 टिएमसी पाणी नांदूर मधमेश्वर जलद कालव्या करीता आरक्षित करावे अशी मागणी श्री.संचेती यांनी केली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कायमस्वरूपी टंचाईग्रस्त/दुष्काळग्रस्त असलेल्या गंगापूर व वैजापूर तालुक्यासाठी नाशिक जिल्ह्यात एकूण 4 धरणे (मुकणे, भावली, भाम व वाकी) बांधण्यात आलेली आहेत. नांदूर मधमेश्वर जलद कालव्यावर एकूण 43,860 हेक्टर सिंचन क्षेत्र निर्मित झालेले असून लाभार्थी गावांची संख्या 102 एवढी आहे.
ना.म.जलद कालव्याकरीता नाशिक जिल्ह्यात बांधण्यात आलेल्या या 4 धरणांचा उपयुक्त पाणीसाठा 386.10 दलघमी एवढा आहे. मंजूर प्रकल्प अहवालानुसार नां.म.जलद कालवा मुखाशी 318 दलघमी (11.23 टिएमसी) पाणी मंजूर आहे. नां.म.का जलद कालव्याच्या धरणांवर नाशिक विभागाने त्यांच्या भागातील पिण्याच्या व औद्योगिक पाणी वापराच्या जवळपास 191 दलघमी (6.74 टीएमसी) पाण्याचे आरक्षण केले आहे. म्हणजेच उपयुक्त पाणीसाठ्याच्या 49.41%.
सदरील बिगर सिंचन आरक्षणामुळे उपरोक्त नांदूर मधमेश्वर जलद कालव्याकरिता मंजूर असलेल्या सिचन पाण्यात मोठ्या प्रमाणात कपात होत आहे व सिंचनाकरिता पाणी उपलब्ध राहत नाही. रब्बी व उन्हाळी हंगामा मिळुन फक्त्त 2 किंवा 3 पाणी आवर्तणे देता येतात. 11.20 टीएमसी पाणी मंजूर असतांना फक्त 3.5 ते 4 टीएमसी पाणी मिळते. पाणी पाळी राबवितांना 45% वहनव्यय दाखवून कालव्याचे पाणी कमी केले जाते. याकरीता याभागाच्या वहनव्ययाबाबत सी.डब्लु.पी.आर.एस.पुणे या संस्थेमार्फत मॉडेल स्टडी करण्यात यावा अशी मागणी देखील बाळासाहेब संचेती यांनी केली आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, मुंबई येथे देखील यचिका त्यांनी दाखल केली होती. त्यामध्ये भावली धरणाचे आरक्षण केलेले पाणी वैतरणा धरणातून मुकणे धरणात येणाऱ्या पाण्यातून देण्यात येईल असे शासनाने सादर केले आहे.
त्यामुळे वैतरणा धरणातून येणा-या पाण्यापैकी किमान 4.5 टिएमसी पाणी नां.म. जलद कालव्याकरीता आरक्षित करावे अशी मागणी बाळासाहेब संचेती यांनी केली आहे.
नामका च्या पाण्यावर टाकण्यात आलेल्या अन्य्याकारक रिझर्व्हेशन विरोधात बाळासाहेब (रवींद्र) संचेती व पंडित अण्णा शिंदे या दोघांनी संभाजीनगर उच्च न्यायालय यांच्याकडे 11/ऑक्टोंबर 2024 पासून रिटपिटशन दाखल केले आहे न्यायालयात न्यायालयीन प्रक्रिया चालू असून उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर जुलै महिन्यामध्ये सुनावणी होणे अपेक्षित असून मा. उच्च न्यायालयाकडून आम्हाला योग्य न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे . असे बाळासाहेब संचेती यांनी सांगितले.
0 Comments