news today, ऑनलाईन खत प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणी ; वैजापुरात शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्यांना निवेदन

वैजापूर, ता.08 - खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने सुरू केलेल्या Framework for Fertilizer Sale (FFS) App या ऑनलाईन खत वितरण प्रणालीमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींबाबत शेतकरी संघटना व सामाजिक कार्यकर्त्यासह वैजापूरच्या शिष्टमंडळाने सोमवारी (ता.08) उपविभागीय कृषी अधिकारी श्री गंजेवार व तालुका कृषी अधिकारी व्यंकटेश ठक्के यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. 

कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देताना शेतकरी संघटना राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी ...

शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश पाटील तांबे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाशबापू ठुबे यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी यावेळी उपस्थित होते. 

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर लागू केलेल्या FFS App द्वारे खत बुकिंग करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत. बुकिंग होत नाही,OTP मिळत नाही, सर्व्हर एरर येत आहे, ॲप वारंवार बंद पडत आहे, ॲप सुरू झाले तर रेंज असत नाही, रेंज असली ॲप सुरू झाले तर मोबाईल चार्जिंगसाठी लाईट उपलब्ध राहत नाही आणि सर्व उपलब्ध असले तरी शेतकऱ्याकडे रिचार्ज मारण्यासाठी पैसे नाही.अशा तांत्रिक समस्यांमुळे ऐन पेरणीच्या काळात खत खरेदी प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नसणे, नेटवर्क व इंटरनेटची समस्या, ऑनलाईन प्रक्रियेची पुरेशी माहिती नसणे यामुळेही शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. अनेक शेतकरी उधारीवर खत घेऊन शेती करतात. बँका वेळेवर पीक कर्ज देत नसल्याने शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत आहेत. पारदर्शकतेसाठी शासनाचा ऑनलाईन प्रणाली सुरू करण्याचा हेतू चांगला असून या निर्णयाचे संघटना स्वागत करते. मात्र, कोणतीही नवीन प्रणाली राबविताना ग्रामीण भागातील परिस्थिती व शेतकऱ्यांच्या अडचणींचा विचार होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची खात्री करून प्रणाली प्रभावीपणे राबविण्यात यावी. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश पाटील तांबे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष  प्रकाश (बापु) ठुबे ,सरपंच काकासाहेब चंदने, विजय पाटील काळे, सुनील पाटील गिरे, शुभम पाटील न्हावले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जुबेर चाऊस, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका (बीएलओ)  रामकिसन ठेंग, रामेश्वर बोडखे, नंदकुमार मतकर यांच्या शिष्टमंडळासोबत उपविभागीय कृषी अधिकारी श्री गंजेवार व तालुका कृषी अधिकारी  व्यंकटेश ठक्के यांनी सविस्तर चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.


 

Post a Comment

0 Comments