वैजापूर तालुक्यातील जरुळ येथील घटना ...
वैजापूर, ता.29 - नवविवाहित तरुणीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील जरुळ गावात गुरुवारी (ता.28) दुपारी घडली. वैशाली रामेश्वर सुर्यवंशी (30 वर्ष) रा. शिऊर असे मयत तरुणीचे नाव आहे. वैशाली हिचे अवघ्या आठ महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
दोन दिवसांपासुन वैशाली माहेरी जरुळ येथे आली होती. घरात कुणी नसल्याने बुधवारी ती घरातून बाहेर पडली होती. ती परत न आल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. दरम्यान, गावाजवळील एका विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला. ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. रात्री उशीरा शिऊर येथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, तरुणीच्या अकाली निधनामुळे गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
0 Comments