देवगांव रंगारी येथे जिल्हा परिषद उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा
देवगांव रंगारी, ता.02 - प्रचारात टीका न करता कामावर बोला असे सांगतानाच, सत्ता येते-जाते, पण नाव एकदा गेले तर परत मिळत नाही म्हणून जितके करता येईल तितकेच बोलतो. योग्यवेळी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार व शेतकऱ्यांची कर्जमाफीही केली जाईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवगाव रंगारी येथे सोमवारी (ता.02) जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना केले.
आपल्या भाषणात ते म्हणाले, “मी जे बोलतो ते करून दाखवतो. योग्य वेळी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहे, हे वचन पूर्ण होणारच आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफीही केली जाईल. सत्ता येते-जाते, पण नाव एकदा गेले तर परत मिळत नाही. म्हणून जितके करता येईल तितकेच बोलतो.”
लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, “या योजनेत फक्त दसरा-दिवाळीलाच नाही, तर दर महिन्याला ओवाळणी दिली जाते. निधी देताना ‘पैसे नाहीत’ हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही. ज्याच्या पाठीशी महिला, त्याचाच विजय निश्चित असतो.” कन्नड - वैजापूर तालुक्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, आतापर्यंत या तालुक्यातील आमदारांना भरभरून निधी देण्यात आला असून, लाडकी बहीण आमदार संजना जाधव यांच्या माध्यमातून तालुक्यातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यात येईल. प्रचारात टीका न करता कामावर बोलणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आमदार रमेश बोरनारे, आमदार संजना जाधव यांनीमनोगत व्यक्त केले. ऊस कामगारांच्या मुलांसाठी निवासी वसतिगृहाच्या मागणीवर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले. सभेला पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदिपान भुमरे, आमदार रमेश पाटील बोरनारे, आ.संजना जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व नागरीक मोठ्यासंख्येने उपस्थित होते. उशिरा सभा सुरू होऊनही महिलांचा संयम व उपस्थिती हे सभेचे वैशिष्ट्य ठरले.
0 Comments