news today, वैजापूर तालुक्यात खरीपाच्या ७५ टक्के पेरण्या पूर्ण

वैजापूर, ता.10 -  जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या मोसमी पावसामुळे वैजापूर तालुक्यात खरीप हंगामातील आला असून आतापर्यंत तालुक्यात 75 टक्के उरकल्या आहेत. येत्या काही दिवसातच उर्वरित पेरण्यांची कामे पूर्ण होणार असून त्या अनुषंगाने बळीराजा बी बियाणे, खते पेरणी या कामात गुंतला आहे. 

जून महिन्यात मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेले असले तरी जवळपास दहा दिवस पावसाने दमदार हजेरी लावल्याने जूनची सरासरी ओलांडून ११२.२० मिमी पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांनी झपाट्याने पेरणीची कामे उरकण्यास सुरुवात केली. परिणामी आतापर्यंत  सुमारे एक लाख एक हजार ७२१ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या असून यात मका व कपाशीचे प्रमाण लक्षणीय आहे. तालुक्यात एक लाख ३४ हजार ८९४ हेक्टर क्षेत्र पेरणीलायक असून यातील सुमारे ४२ हजार ७०८ हेक्टर क्षेत्रावर आतापर्यंत मका पेरणी झाली आहे तर सुमारे ३५ हजार ९१५ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली आहे. यंदा उशिरा पाऊस पडल्याने मकाच्या क्षेत्रात घट होण्याची अपेक्षा असताना शेतकऱ्यांनी पुन्हा कपाशीच्या ऐवजी मकाला पसंती दिल्याचे चित्र सध्या तालुक्यात असून आतापर्यंत उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार कपाशीपेक्षा तब्बल सहा हजार ८०० हेक्टर अधिक क्षेत्रावर मका पेरणी झाली आहे. मकाला मिळत असलेली आधारभूत किंमत व कापशीच्या भावातील अनिश्चितता या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा कल मका पेरणीकडे अधिक असल्याचे दिसते. मका व कपाशीशिवाय शेतकऱ्यांनी बाजरी, ज्वारी, तूर, उडीद, मूग, सोयाबीन, भुईमूग, ऊस ही पिके देखील घेतली आहेत. यात आतापर्यंत सात हजार ३४३ हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात आली आहे. चार हजार ७६४ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे तर जवळपास दोन हजार दोनशे हेक्टर क्षेत्रावर बाजरी पेरणी झाली आहे. जुलै महिन्यात साधारणपणे १०६.५ मिमी पाऊस पडतो. या महिन्यात तालुक्यात सहा दिवस पाऊस पडला असून आतापर्यंत ४३.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अजूनही काही भागात शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. 

तालुक्यातील बहुतांश छोट्या व मध्यम प्रकल्पात पाणी साठा असून सध्या होत असलेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. गंगथडी भागात नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्यामुळे सिंचनाची सोय होत असली तरी या भागातील शेताकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. याशिवाय, बोर दहेगाव, शिवना टाकळी, मन्याड, कोल्ही, खंडाळा, नारंगी माध्यम प्रकल्प या  लघु व मध्यम प्रकल्पतील पाण्यावर काही गावांचे सिंचन अवलंबून आहे.

वैजापूर तालुक्यात झालेली पेरणी 

मका -- ४२, ७०८.६ हे

बाजरी -- २१९९.३ हे 

ज्वारी--४६ हे 

तूर---७३४३ हे 

उडीद-- १३३.४

मूग---३५८९.७० हे

सोयाबीन--४७६४ हे

भुईमूग---२७६५.७०

कपाशी----३५, ९१५ हे.

वैजापूर तालुक्यात झालेला पाऊस

सरासरी पर्जन्यमान- ५००.८५ मिमी 

जून----११२.२० मिमी 

जुलै.----४३.१ मिमी

Post a Comment

0 Comments