ओव्हरटेक करताना कार कठड्यावर आदळली ; कारचा अक्षरशः चेंदामेंदा
वैजापूर,, ता. 08 - ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्यालगतच्या कठड्यावर आदळली. या अपघातात सहा जण जखमी झाले. हा अपघात मंगळवारी (ता. 08) सकाळी सुमारे आठच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील जांबरगाव शिवारात समृध्दी महामार्गावर घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 01 बीएफ 1392 क्रमांकाच्या कारमधून शेख कुटुंबीय मुंबईहून छत्रपती संभाजीनगरकडे जात होते. जांबरगाव शिवारात ओव्हरटेक करताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट कठड्यावर जाऊन आदळली. या अपघातात कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.
या अपघातात चालक सय्यद शहीद (वय 35 वर्ष), शेख इब्राहिम (वय 32 वर्ष), अहमद सय्यद (वय 27 वर्ष), नफीसा (वय 29 वर्ष) यांच्यासह एकूण सहा जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच सुरक्षा रक्षक गोपाल जोहरे, कृष्णा राठोड, रणजीत जंजाळ, तसेच पोलिस कर्मचारी पैठणकर व उशीर यांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेच्या सहाय्याने सर्व जखमींना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कार रस्त्याच्या बाजूला हटवून समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
0 Comments