जालना, ता.05 - अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात 6 लाख 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण हे शनिवारी (ता.06) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकले
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराकडून वाळू उपसा करणाऱ्या पोकलँड मशीनवर कारवाई न करणे तसेच वाळू वाहतूक करणारे सहा हायवा ट्रक सुरू ठेवण्यासाठी तहसीलदारांनी मोठ्या रकमेची मागणी केली होती. पोकलेन मशीनवर कारवाई न करण्यासाठी प्रति दिवस प्रमाणे 08 दिवसांचे 12 लाख रुपये मागणी केली. त्यापैकी तक्रारदार यांनी 8 लाख रुपये तहसीलदार विजय चव्हाण यांना यांना यापूर्वीच दिले. त्यातील उर्वरीत 4 लाख रुपये व सहा हायवा टीप्परला वाळू वाहतुक करण्यासाठी प्रति टीप्पर 50,000/- रुपये प्रमाणे 3 लाख रुपये असे एकूण 7 लाख रुपये लाचेची मागणी केली होती. परंतु तक्रारदार यांना उर्वरीत लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड येथे 26 मे 2026 रोजी तक्रार केली होती.
याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल झाल्यानंतर पडताळणीत लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड येथील एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले, पोलिस हवालदार मच्छिंद्र बीडकर, अमोल खरसाडे, प्रदिप सुरवसे व चालक अंबादास पुरी यांच्या पथकाने सापळा रचून छत्रपती संभाजीनगर येथे तहसीलदार विजय चव्हाण यांना 6.40 लाख रुपयांची लाच स्वीकारताच ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक समाधान कवडे हे अधिक तपास करीत आहेत.
0 Comments