news today, सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या ; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल


 वैजापूर, ता.21 - शहरातील गोल्डन नगर भागात शेख करीम शेख (वय 45) या व्यापाऱ्याने खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी सात वाजेला उघडकीस आली. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत शेख करीम हे बटाटा व्यापारी म्हणून परिचित होते. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड केला असून हा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे.
    

अन्नू आझम शेख (रा. गोल्डन नगर), वसीम बाबू बागवान (रा. गंगापूर), विलास शेटे (रा. श्रीरामपूर), घायवट बाई (फुलेवाडी रोड, वैजापूर), विनोद पद्मसिंग राजपूत (परदेशीं गल्ली वैजापूर), मुकेश पद्मसिंग राजपूत (महाराणा प्रताप रोड, वैजापूर) व विक्रम शिवसिंग राजपूत (महाराणा प्रताप रोड, वैजापूर) अशी या प्रकारणातील सात आरोपींची नावे आहेत. पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, या सात आरोपीनी पैशाच्या कारणावरून शेख करीम यांना त्रास दिला. या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे शेख करीम यांनी व्हिडिओत म्हंटले आहे. 

या प्रकरणी रिजवान शौकत खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोलीस उप निरीक्षक युवराज पाडळे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments