381 केंद्रावर मतदान साहित्य रवाना...
वैजापूर, ता.06 - उद्या होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी वैजापूर तालुक्यातील 381 मतदान केंद्रावर शुक्रवारी मतदान साहित्य रवाना करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अरुण जऱ्हाड, तहसीलदार सुनील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली. या प्रक्रियेसाठी जवळपास दिड हजार निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे आठ गट व पंचायत समितीचे 16 गण असून या 24 जागांसाठी शंभर उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मतदान करण्यासाठी 381 मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली असून प्रत्येक केंद्रावर एक केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांसह चार अधिकारी व पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. 18 पोलीस अधिकारी, 276 पोलीस अंमलदार, गृह रक्षक दलाचे 380 जवान व राज्य राखीव दलाची तीन पथके तैनात करण्यात आली आहेत. प्रत्येक केंद्रावर चार अधिकारी याप्रमाणे एक हजार 124 कर्मचारी असे जवळपास दिड हजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रशासनाने नेमणूक केली आहे.
मतदान साहित्य रवाना करण्यासाठी एसटी महामंडळाच्या 33 बस व अन्य खासगी वाहने प्रशासनाने ताब्यात घेतली असून या वाहनाच्या माध्यमातून मतदान अधिकारी व मतदान साहित्य रवाना करण्यात आले. या निवडणुकीत दोन लाख 24 हजार 388 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
0 Comments