वैजापूर, ता.25 - वैजापूर नगर परिषदेच्या दोन डिसेंबरला होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक दोन ब मधून शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरलेले संदीप नामदेव बोर्डे यांचा अर्ज वैजापूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी (ता. 25) बाद ठरवला. त्यामुळे संदीप बोर्डे यांची प्रभाग क्रमांक दोन ब मधील उमेदवारी रद्द झाली आहे. प्रभाग क्रमांक दोन ब मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विशाल संचेती यांनी दाखल केलेल्या निवडणूक अपील अर्जावर न्यायालयाने हा निकाल दिला. हा निकाल देताना न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अरुण जऱ्हाड यांनी 18 नोव्हेंबर रोजी दिलेला निकाल फेटाळला आहे.
संदीप बोर्डे यांनी प्रभाग क्रमांक दोन ब मधून शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु, संदीप बोर्डे हें मेसर्स जगदंबा कॉन्स्ट्क्टशनचे भागीदार असून त्या अंतर्गत त्यांनी नगर परिषदेची कामे घेतल्याने ते नगर परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरू शकत नाहीत असा आक्षेप विशाल जीवनलाल संचेती यांच्यातर्फे घेण्यात आला होता. यावर 18 नोव्हेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अरुण जऱ्हाड यांनी निकाल देत संचेती यांचे अपील अमान्य केले. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार संदीप बोर्डे यांना दिलासा मिळाला होता. तथापि, संचेती यांनी या निकालाला आव्हान देत येथील सत्र न्यायालयात धाव घेतली. या अर्जावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती एस.के.उपाध्याय यांच्या कोर्टासमोर मंगळवारी (ता.25) सुनावणी होऊन न्यायालयाने संदीप बोर्डे यांची उमेदवारी रद्द ठरवली.
विशाल संचेती यांच्यातर्फे ॲड.विपुल देशपांडे व ॲड.निखिल हरिदास यांनी तर शासनातर्फे सरकारी वकील ॲड.कृष्णा गंडे यांनी काम पाहिले.
0 Comments