वैजापूर, ता.04 - वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामहरी जाधव यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत, बाजार समितीच्या 18 पैकी तब्बल 13 संचालकांनी त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला आहे. सोमवारी हा प्रस्ताव औपचारिकरीत्या जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आल्याने वैजापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मे 2023 मध्ये झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीनंतर शिवसेनेचे रामहरी जाधव यांनी सभापतीपदाची सूत्रे हाती घेतली होती. मात्र, अवघ्या दीड-पावणेदोन वर्षांच्या काळातच त्यांच्याविरुद्ध संचालकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मधील कलम 23 अंतर्गत ही कारवाई करण्याची मागणी संचालकांनी केली आहे.
संस्थेच्या उद्दिष्टांना हरताळ फासणे आणि नियमांचे उल्लंघन करून कारभार करणे, असे गंभीर आरोप जाधव यांच्यावर करण्यात आले आहेत. संचालक मंडळाला विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने निर्णय घेणे, महत्त्वाच्या विषयांवर चर्चा न करताच ठराव मंजूर करणे आणि मासिक सभांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असणे, या कारणांमुळे हे पाऊल उचलल्याचे असंतुष्ट संचालकांनी स्पष्ट केले आहे.
अविश्वास ठराव दाखल करणाऱ्या संचालकांच्या म्हणण्यानुसार, मंजूर उपविधी आणि अधिनियमातील तरतुदीनुसार शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि बाजार समितीतील मूलभूत सुविधांसाठी ठोस प्रयत्न करण्यात सभापती अपयशी ठरले आहेत. बाजार समितीच्या कारभारात पारदर्शकता नसल्याने त्याचा फटका विकासकामांना बसत असल्याचा दावाही करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आणि जिल्हा उपनिबंधकांनी या अविश्वास ठरावावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या अविश्वास ठरावाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) एकूण 13 संचालकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे आणि भाजपचे नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. मात्र, गेल्या काही काळापासून या दोन्ही नेत्यांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत.
विधानसभा निवडणुकीपासून आमदार रमेश बोरनारे आणि डॉ. दिनेश परदेशी यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. हा वाद आता बाजार समितीपर्यंत येऊन पोहोचला असून, भाजपने संचालकांच्या माध्यमातून शिवसेनेला खिंडीत गाठण्याची रणनीती आखल्याचे दिसून येत आहे. आगामी नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा अविश्वास ठराव म्हणजे शिवसेनेला दिलेला मोठा धक्का मानला जात आहे.
बाजार समितीतील हा सत्तासंघर्ष आता कोणत्या वळणावर जातो आणि जिल्हा प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या राजकीय घडामोडींमुळे वैजापूरमधील समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
0 Comments