news today, मेंटेनन्सचे काम करत असताना विजेचा धक्का ; झीरो वायरमनचा जागीच मृत्यू

महावितरणचा हलगर्जीपणा  ; अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी...

वैजापूर, ता.16 -  मेंटेनन्सचे काम करत असताना विजेचा धक्का लागल्याने झिरो वायरमनचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वैजापूर शहरातील सावतानगर परिसरात शुक्रवारी दुपारी घडली. सोमनाथ आसाराम पानडघळे (वय 25, रा. आघुर) असे या घटनेतील मृताचे नाव आहे .याप्रकरणी महावितरणच्या अधिकाऱ्यांवार गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आक्रमक झालेल्या लोकप्रतिनिधी व संतप्त नागरिकांनी महावितरणच्या स्टेशन रस्त्यावरील कार्यलयात, उपजिल्हा रुग्णालयात व पोलीस ठाण्यात गर्दी केली व त्या ठिकाणी ठिय्या दिला. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. 

महावितरणच्या  हलगर्जीपणामुळे सोमनाथ याचा हकनाक मृत्यू झाल्याचा आरोप करत जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह हातात घेणार नाही अशी भूमिका कुटुंबियांसह नागरिकांनी घेतली. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सोमनाथ हा मागील दिड ते दोन वर्षांपासून महावितरणमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करत असल्याची माहिती समोर आली असून त्याच्या पश्चात आई व एक भाऊ असा परिवार आहे. काम सुरु असताना विद्युत प्रवाह कुणी सुरु केला तसेच या घटनेला कोण जबाबदार आहे असे प्रश्न या घटनेच्या निमित्ताने उपस्थित होत असून सखोल चौकशी करून सदोष व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments