वैजापूर, ता.04 - वैजापूर तालुक्यात ऐन पेरणीच्या काळात म्हणजे जून महिन्यात केवळ नऊ दिवस पाऊस पडला. त्यातच मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेले. त्यामुळे खरीप पेरण्या रखडल्या होत्या. मात्र नंतरचे काही दिवस जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पेरणीलायक पाऊस झाल्याचे चित्र असून शेतकरी आता मशागत करून पेरण्यांकडे वळल्याचे चित्र आहे. तालुक्यात 30 जून अखेर सरासरी 112.20 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. हा पाऊस जून महिन्याच्या सरासरीच्या 109.4 टक्के असून या महिन्याची सरासरी 102.6 मिमी ओलांडून 112.20 मिमी पाऊस पडल्याने उशिरा का होईना खरीप पेरण्यांना वेग आला आहे.
वैजापूर तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान 500.85 मिमी असून जून महिन्यात सरासरी 102.60 मिमी पाऊस पडतो. मात्र यावेळी पावसाने विलंब केला. 25 जुनपर्यंत केवळ पाच दिवस पाऊस पडला. त्यानंतर चार दिवस पाऊस झाल्याने पावसाची सरासरी भरून निघाली आहे. मात्र मागील दोन दिवसांपासून शहर व तालुक्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण असले तरी पावसाने उघडीप दिली आहे. 30 जून अखेर तालुक्यातील वैजापूर शहरासह तालुक्यातील तेरा मंडळात सरासरी 112.20 मिमी पावसाची नोंद झाली असून जानेफळ मंडळात सर्वधिक 177.30 मिमी म्हणजेच 173 टक्के पाऊस पडला आहे. नागमठाण मंडळात सर्वात कमी म्हणजे 46.8 मिमी म्हणजे केवळ 46 टक्के पाऊस पडला आहे. कमी पाऊस पडल्याने या परिसरातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी पुरेशा पावसाची प्रतीक्षा आहे. या मंडळात जून महिन्यात फक्त दोन दिवस पाऊस पडला आहे. नागमठाण व बाबतरा वगळता तालुक्यातील अन्य मंडळात 100 मि.मी.हून अधिक पाऊस पडला आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. तालुक्यातील मंडळनिहाय पाऊस पुढीलप्रमाणे:
वैजापूर तालुक्यातील आठ सर्कलमध्ये झालेला पाऊस ...
वैजापूर (115 मि.मी), खंडाळा (106.6 मि.मी), शिऊर (128.9 मि.मी), बोरसर (110.5 मि.मी) लोणी (119.3 मि.मी), गारज (148.3 मि.मी), लासूरगाव (103.7 मि.मी), महालगाव ( 117.1 मि.मी) नागमठाण (46.8 मि.मी) लाडगाव (108.3 मि.मी), घायगाव (108.3 मि.मी), जानेफळ (177.3 मि.मी) बाबतरा ( 69.0 मि.मी)
0 Comments