स्वीकृत सदस्यपदी शिवसेनेतर्फे संजय बोरणारे यांना तर भाजपतर्फे प्रशांत कंगले व प्रकाश चव्हाण यांना संधी
पालिकेच्या फुले - आंबेडकर सभागृहात नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता.16) झालेल्या सर्वसाधारण सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली. मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी त्यांना सहकार्य केले.
उपाध्यक्षपदासाठी भाजप - राष्ट्रवादी काँग्रेस युतीतील शेख रियाज व विशाल संचेती या दोघांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. युतीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक रियाज शेख यांनी अर्ज भरला असताना भाजपचे नगरसेवक विशाल संचेती यांनीही या पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे उपाध्यक्षपदाच्या निवडीत ट्विस्ट निर्माण झाले होते . भाजप - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात निवडणूक पूर्व युती झालेली असल्याने छाननीत भाजपचे विशाल संचेती यांचा अर्ज फेटाळण्यात आला व युतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख रियाज यांची निवड जाहीर करण्यात आली.
स्वीकृत सदस्य पदासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली होती. मर्चंट बँकेचे संचालक विजय दायमा, माजी नगरसेवक इम्रान कुरेशी, वाजेद कुरेशी हे स्वीकृत सदस्य पदासाठी इच्छूक होते. त्या सर्वांची मात्र निराशा झाली. स्वीकृत सदस्यपदी शिवसेनेच्यावतीने संजय बोरणारे यांना तर भाजपतर्फे प्रशांत कंगले व प्रकाश चव्हाण यांना संधी देण्यात आली. निवड झालेल्या उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांचे नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशी व मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी अभिनंदन केले.
शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याची गरज - माजी नगराध्यक्ष साबेर खान
नगरपालिकेची निवडणूक संपली असून आता राजकारण न करता शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करणे गरजेचे असल्याचे माजी नगराध्यक्ष साबेर खान यांनी या निवडीनंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. निवडून आलेला नगराध्यक्ष किंवा नगरसेवक हा कोणत्याही एका पक्षाचा नसून तो जनतेचा प्रतिनिधी असतो असेही त्यांनी स्पष्ट केले.
0 Comments