news today, छत्रपती संभाजीनगर जिल्हयात 1632 कोटींची कर्जमाफी ; 1 लाख 80 हजार 176 शेतकरी पात्र

छत्रपती संभाजीनगर, ता.02 -  राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत जिल्हयातील 1लाख 80 हजार 176 शेतकरी पात्र ठरले आहेत.या सर्वांचे 1हजार 632 कोटी 12 लक्ष रुपयांचे कर्जमाफ होणार आहे. 

अद्याप 712 शेतकऱ्यांचे आधार संलग्नीकरण होणे प्रलंबित असून आधार संलग्नीकरणानंतर कर्जमाफीच्या या आकडेवारीमध्ये वाढ होईल,असे सांगण्यात येत आहे. ही आकडेवारी बँकांनी पोर्टलवर प्रसारित केली आहे. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत अल्पमुदत पीक कर्ज घेतलेल्या आणि 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेल्या तसेच 31मार्च 2026 पर्यंत कर्जाची परतफेड न केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. एका किंवा अनेक बँकांमधील सर्व पात्र कर्जखात्यांवरील मुद्दल व व्याजासह एकूण थकबाकीची कमाल दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. यासाठी शेतीच्या क्षेत्रफळाची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही. 

अल्पमुदत पीक कर्जाचे मध्यम मुदत कर्जात पुनर्गठन किंवा फेर पुनर्गठन करण्यात आले असून त्याचे हप्ते 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असतील, तर अशा शेतकऱ्यांनाही दोन लाख रुपयांच्या मर्यादेत कर्जमाफीचा लाभ मिळेल. ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 चा लाभ घेतला आहे, त्यांना या नव्या योजनेत कमाल 50 हजार रुपयांपर्यंतच कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.  ज्या शेतकऱ्यांची थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक आहे , त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. अशा शेतकऱ्यांनी अतिरिक्त रक्कम संबंधित बँकेत जमा केल्यानंतर शासनाकडून दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम एकमुश्त योजनेअंतर्गत अदा केली जाईल.

2019 च्या कर्जमाफीचे लाभार्थी असल्यास 50 हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकीतील अतिरिक्त रक्कम शेतकऱ्यांनी भरल्यानंतरच त्यांना 50 हजार रुपयांचा ओटीएस  लाभ मिळेल. शेतकऱ्यांना त्यांचा हिस्सा भरण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.




Post a Comment

0 Comments