news today, वैजापूर पंचायत समिती कार्यालयात गाढव सोडले ; 12 आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल


वैजापूर, ता.15 - भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सतत चर्चेत असलेले वैजापूर पंचायत समिती कार्यालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ऐन आठवडी बाजाराच्या दिवशी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची बैठक घेतल्याने शेतकऱ्यांना ताटकळत ठेवण्यात आल्याचा आरोप करत आंदोलकांनी थेट पंचायत समिती कार्यालयात ‘गाढव सोडा’ आंदोलन छेडले. या वेळी आंदोलकांनी कार्यालयात मोठ्या संख्येने गाढवे सोडून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.पंचायत समिती कार्यालयात गाढवे सोडून आंदोलन करणाऱ्या 12 आंदोलनकर्त्यांविरुद्ध मंगळवारी सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, तसेच अन्य विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मागील काही दिवसांपासून पंचायत समिती कार्यालयाबाहेर शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरू आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत नवीन कामांना मंजुरी द्यावी, तसेच सन 2020 पासून आजपर्यंत झालेल्या कामांमधील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करावी याशिवाय अनेक शेतकऱ्यांची देयके अद्याप प्रलंबित असून ती तत्काळ अदा करावीत अशीही मागणी करण्यात येत आहे. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चातून मनरेगा अंतर्गत विहिरी व इतर कामे सुरू केली. मात्र त्यांचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान सोमवारी आठवडी बाजाराचा दिवस असल्याने मोठ्या संख्येने शेतकरी आपल्या कामांसाठी पंचायत समिती कार्यालयात दाखल झाले होते. मात्र याच वेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक सुरू असल्याने कामकाज ठप्प झाले. “शेतकऱ्यांच्या कामाच्या दिवशीच बैठक घेण्याचे कारण काय?” असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. आंदोलकांनी प्रशासनावर टीका करत “प्रशासन गाढवासारखे झाले असून त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काहीही देणे-घेणे नाही” अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच जर तातडीने मागण्यांची दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. या प्रकारामुळे पंचायत समिती परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

12 आंदोलकर्त्यांवर पोलिसात गुन्हा दाखल ...

पंचायत समिती कार्यालयात गाढवे सोडून आंदोलन करणाऱ्या 12 आंदोलनकर्त्यांविरुद्ध मंगळवारी सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, तसेच अन्य विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी कनिष्ठ प्रशासन अधिकारी विजय ढाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 12 आंदोलनकर्त्यांवर विविध कलमान्वये वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख मोजम, निवृत्ती रंगनाथ सोनवणे, बाळासाहेब भास्कर बनसोड, अजय साळुंके व अन्य आठ जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे. या कारवाईमुळे सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. लोकशाही व्यवस्थेत नागरिकांना आपली मते मांडण्याचा आणि आंदोलन करण्याचा अधिकार असतो. मात्र, अशा प्रकारे गुन्हे दाखल करून आंदोलकांना दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली गेल्याचे पंचायत समिती प्रशासनाचे म्हणणे आहे.

Post a Comment

0 Comments