वैजापूर, ता.07/ प्रतिनिधी - राज्य शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत मंजूर झालेल्या भांडी संचाचा (गृहोपयोगी संच) लाभ घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांना सध्या 'ओरबाडण्याचे' काम सुरू आहे.
त्यामुळे वाटप सुरू असलेल्या गोदामांभोवती लाभार्थ्यांपेक्षा दलालांचाच 'विळखा' आहे. एवढेच नव्हे तर गोदामचालकही आपले 'उखळ' पांढरे करून घेत आहेत.
राज्य शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या मोफत भांडी संच (गृहोपयोगी संच) योजनेच्या माध्यमातून नागरिकांची लूट सुरू असून या पार्श्वभूमीवर शहरात अनेकांनी 'दुकाने' थाटली आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दोन हजारांपासून ते चार हजार रुपयांपर्यंत रक्कम उकळली जात आहे. त्यामुळे 'पैसे द्या अन् बोगस नोंदणी करून कामगार व्हा' अशी स्थिती आहे. योजनेच्या माध्यमातून सर्वच यंत्रणा लूट करीत असताना दुसरीकडे सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांसाठी मोफत भांडी संच यासह 33 योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यात विशेषतः बांधकाम कामगारांसाठी मोफत भांडी संच ही योजनेवर सध्या कामगारांच्या उड्या पडत आहे. कामगारांच्या जीवनात सन्मान, सुलभता आणि स्थैर्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. योजनेचा हेतू उदात्त असला तरी यातील काही यंत्रणेसाठी ही योजना मात्र खाती 'गव्हाण' बनली आहे. दरम्यान तालुक्यात 25 ऑगस्टपासून लाभार्थ्यांना भांडीसंच वाटप सुरू आहे. यासाठी तालुक्यातील रोटेगाव रेल्वेस्थानकानजीक व चिंचडगाव येथे गोदाम असून लाभार्थ्यांना दूरपर्यंत जाऊन भांडीसंच आणावा लागत आहे. अगोदर ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यापासून ते मंजुरीपर्यंत संगणक चालकांनी लाभार्थ्यांना लुटले. यापोटी पाच -पाच हजार रुपये घेण्यात आले. इथेच लाभार्थ्यांची सुटका झाली. असे नाही. भांडी संच घेतांनाही लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. संच घेतांना दलाल एक ते दीड हजार रुपये उकळून आपल्या 'तुंबड्या' भरीत आहेत. परंतु ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. तालुक्यात भांडीसंच घेणाऱ्या लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर बोंब सुरू असतानाच कुणीच गांभीर्याने घ्यायला तयार नाही. परंतु हे असंच सुरू राहिल्यास दलालांची नेहमीच 'चांदी' होईल.
योजना नेमकी कुणासाठी?
बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने भांडीसंच वाटपाची जबाबदारी मुंबई येथील मफतलाल इंडस्ट्रीला दिलेली आहे. त्यांच्यामार्फत रोटेगाव व चिंचडगाव येथे गोदाम उभारण्यात आले असून हे गोदाम दोघांना चालविण्यासाठी दिले आहेत. परंतु या 'वाहत्या गंगेत' गोदामचालकही आपले हात 'धुवून' घेत आहेत. त्यामुळे ही योजना नेमकी कुणासाठी आहे? असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.
चार आण्यांची कोंबडी अन् बारा आण्यांचा मसाला
दरम्यान मफतलाल इंडस्ट्रीने या संचाची किंमत 8 हजार 600 रुपये निश्चित केलेली आहे. वास्तविक पाहता बाजारात हा संच खरेदी केल्यास पुरते पाच हजार रुपयेही लागणार नाही. परंतु लाभार्थ्यांना ऑनलाईन करण्यापासून, मंजुरी व हातात संच पडेपर्यंत या रकमेपेक्षा जास्त रक्कम मोजावी लागली. त्यामुळे 'चार आण्यांची कोंबडी अन् बारा आण्यांचा मसाला' अशी गत या संचाची झाली आहे.
दररोज 500 लाभार्थ्यांना भांडी संच वाटप करण्यात येतो. रोटेगावच्या गोदामातून 25 ऑगस्टपासून ते आजपर्यंत 2456 लाभार्थ्यांना संच वाटप करण्यात आला. वैजापूर तालुक्यात एकूण 36 हजार 772 कामगारांची नोंदणी झालेली आहे. यात 17 हजार 403 सक्रिय नोंदणी आहे.
- ज्ञानेश्वर मोटे, मुख्य प्रभारी, बांधकाम सुविधा केंद्र, वैजापूर
0 Comments