कन्नड तालुक्यातील पळस खेडा येथील घटना...
प्रभाकर जाधव
------------------------
गारज, ता.20- : कन्नड तालुक्यातील पळसखेडा येथे बिबट्याने चक्क घरात घुसून वयोवृद्ध शेतकऱ्यास ठार केल्याची घटना मंगळवारी (ता.19) रोजी मध्यरात्री घडली. सुभाष लक्ष्मण काकडे (वय 72 वर्ष) असे ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
पळसखेडा येथील सुभाष काकडे आचारी म्हणून काम करुन ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांना दोन ते अडीच एकर शेती असून शासकीय अनुदानातून घरकुल मंजूर झाले आहे..त्याच घरकुलाचे काम पूर्ण झाले असून घराला फक्त दरवाजे बसविणे बाकी होते.आणि ते याच दरवाजे नसलेल्या घरात एकटेच झोपले होते. तर त्यांचे कुटुंबीय पाठीमागील जुन्या घरात झोपले होते. मंगळवारी रात्री बिबट्याने दरवाजे नसलेल्या घरात प्रवेश करुन सुभाष काकडे यांच्यावर हल्ला करीत जागेवर ठार केले. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आल्याने कुटुंबियांनी वनविभागाला घटनेची माहिती दिली.
सुभाष काकडे यांना अर्धांगवायू झाला होता त्यामुळे ते पळू शकत नव्हते.यामुळे ते जागेवर ठार झाल्याचे बोलले जात आहे. देवगाव रंगारी पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ओराळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे.त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी सहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली,सुन,जावई, नातवंडे असा परिवार आहे.
0 Comments