news today, उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक कोण होणार ? वैजापुरात उत्सुकता

वैजापूर, ता.26 - नगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक कोण होणार याची उत्सुकता वैजापूरकरांना लागली असून विजयी उमेदवारांची नावे राजपत्रात दाखल झाल्यानंतर पंचवीस दिवसांच्या आत होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण सभेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

नगरपालिका निवडणुकीत भाजप - राष्ट्रवादी काँग्रेस युतीने विजय मिळवला असून नगराध्यक्षपदासह पंधरा नगरसेवक युतीचे निवडून आलेले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाने स्वबळावर ही निवडणूक लढवली होती. त्यांना दहा जागांवर समाधान मानावे लागले. नगरपालिकेत भाजप - राष्ट्रवादी काँग्रेस युतीला बहुमत मिळाले असून उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक कोण होणार याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. 

पालिका निवडणुकीत बंडोबांना थंड करण्यासाठी स्वीकृत नगरसेवक पदाचे आश्वासन दोन्ही पक्षांकडून देण्यात आलेले आहे. तर निवडणुकीत पराभूत झालेल्यापैकी काहींनी स्वीकृत सदस्यपदासाठी फिल्डींग लावली आहे.आता पालिकेत तीन स्वीकृत सदस्य निवडले जाणार असून स्वीकृत सदस्य पदासाठी भाजपकडून पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रशांत कंगले व माजी नगरसेवक प्रकाश चव्हाण यांची तर शिवसेना शिंदे गटाकडून डॉ.राजीव डोंगरे व राजेंद्र साळुंके यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे आता स्वीकृत सदस्यपदी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

पालिका निवडणुकीतील पक्षीय बलाबल पाहता 25 पैकी 11 नगरसेवक भाजपचे, 10 नगरसेवक शिवसेना शिंदे गटाचे तर 4 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षाचे निवडून आलेले आहेत. भाजप - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या निवडणुकीत युती होती. त्यामुळे उपनगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळते की शिवसेनेला याची उत्सुकताही वाढली आहे. 

उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली असून या पदांवर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments