news today, बाजार समितीकडून दूजाभाव ; संतप्त मका उत्पादक शेतकऱ्यांचा सचिवांना घेराव

बाजार समिती दुजाभाव करत असल्याचा आरोप ...

वैजापूर , ता.14 - शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देण्याच्या ऐवजी बाजार समितीचे प्रशासन लिलाव प्रक्रियेत व्यापाऱ्यांना पाठीशी घालून शेतकऱ्यांमध्ये दुजाभाव करत आहे. त्यामुळे एकाच दर्जाच्या मकाला वेगवेगळ्या शेतकऱ्यांना कमी जास्त भाव मिळून शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. असा आरोप करत भायगाव (तालुका वैजापूर) येथील लक्ष्मण पारसनाथ ठोंबरं या शेतकऱ्याने लिलावासाठी पाच ट्रॅक्टरमधून आणलेली जवळपास दोनशे क्विंटल मका थेट बाजार समिती कार्यालयाच्या आवारात आणली. या मकाला लिलावात व्यापाऱ्यांकडून प्रति क्विंटल एक हजार 618 रुपये भाव देण्यात आला. 
    
मका उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात मका आणून सचिवांना घेराव घातला...

मात्र याच प्रतीच्या मका असलेल्या 26 वाहनाला प्रति क्विंटल 1700 ते 1736 रुपये भाव देण्यात आला. मग हा दुजाभाव का असा संतप्त सवाल मका उत्पादकांनी प्रशासनाला केला. आम्हाला 1700 रुपये भाव द्या. अशी मागणी करत लक्ष्मण ठोंबरे यांच्यासह मनोज नळे, विजय अंभोरे, उमेश उशीर, भावराव ठोंबरे, अरुण जाधवर, भावलाल जाधव या शेतकऱ्यांनी बाजार समितीचे सचिव प्रल्हाद मोटे वं सहाय्यक सचिव एस. के. निकम या दोघांना घेराव घातला वं त्यांना धारेवर धरले. यावर मोटे वं निकम यांनी या शेतकऱ्याने पाच वाजता होत असलेल्या लिलाव प्रक्रियेत पुन्हा सहभाग नोंदवण्याची सूचना केली. मात्र ही सूचना मान्य न झाल्याने मकाचे पाचही ट्रॅक्टर समिती कार्यालयाच्या आवारात उभे करण्यात आले. शासनाने एफएक्यू दर्जाच्या मकासाठी प्रति क्विंटल दोन हजार ४६० रुपये भाव जाहीर केला आहे. जोपर्यंत संचालक मंडळ यावर निर्णय घेत नाही तोपर्यंत येथून ट्रॅक्टर हलवणार नाही अशी भूमिका मका उत्पादकांनी घेतली. सभापती रामहरी जाधव यांचा राजीनामा शेतकरी हितासाठी नाही तर राजकीय सुडापोटी घेतल्याचा आरोप यावेळी मनोज नळे यांनी केला.
   
दरम्यान, शनिवारी झालेल्या लिलावात 46 वाहनाना 1400 ते 1700 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला तर 26 वाहनांना 1700 ते 1736 रुपये भाव मिळाला अशी माहिती बाजार समिती प्रशासनातर्फे देण्यात आली.

Post a Comment

0 Comments