मुंबई, ता.26 - शिवसेना - मनसे युतीची घोषणा करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईचा महापौर मराठीच होणार,तोही आमचाच होणार असे ठणकावून सांगितले. तब्बल 20 वर्षानंतर मुंबईसह अन्य महानगरपालिका निवडणुकांसाठी शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीवर बुधवारी (ता.24) उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी शिक्कमोर्तब केले. त्यावेळी ते बोलत होते.
वरळी येथील हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत युतीची घोषणा करण्यात आली.यावेळी मराठी माणसाच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या भविष्यासाठी एकत्र येत असल्याचा पुनरुच्चार ठाकरे बंधूंनी केला. कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे असे मी एका मुलाखतीत म्हणालो होतो. तेंव्हापासून आम्ही एकत्र येण्यास सुरुवात झाली.त्यानंतर बरेच दिवस महाराष्ट्राला शिवसेना - मनसेच्या युतीची प्रतीक्षा होती. ती युती आज झाली आहे.असे राज ठाकरे म्हणाले.
कोण किती जागा लढवणार, आकडा काय हे आम्ही माध्यमांना आता सांगणार नाही.असे सांगतानाच मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणसावर ज्यांचे प्रेम आहे त्यांनी युतीच्या मागे उभे राहावे असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. महाराष्ट्रात सध्या लहान मुले पळविणारी टोळी फिरत आहे, त्यात आणखी दोन व्यक्ती सामील झाल्या आहेत, ते राजकीय पक्षांमधील मुले पळवत आहेत. त्यामुळे जे निवडणूक लढविणार आहेत त्यांना दोन्ही पक्षांकडून उमेदवारी दिली जाईल. मुंबईचा महापौर मराठीच होईन, तोही ठाकरे बंधूचाच असे ते म्हणाले.
0 Comments