वैजापूर, ता.24 - नगर परिषद निवडणुकीच्या निकालाने शहरात कुठे आनंदाचे भरते आले होते, तर कुठे पराभवाचे सावट होते. मात्र, याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी आपली 'हातोटी' दाखवल्याचा धक्कादायक प्रकार वैजापूर शहरात समोर आला आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांच्या विजयी मिरवणुकीच्या उत्साहात एका शेतकऱ्याला आपल्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांच्या सोन्याच्या साखळीला मुकावे लागले आहे. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, शहरात या चोरीची मोठी चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भास्कर विश्वनाथ आहेर (वय 53, रा. लाख खंडाळा, सध्या रा. सिडको, छत्रपती संभाजीनगर) हे रविवारी (ता.21) वैजापूर नगर परिषद निवडणुकीचा निकाल पाहण्यासाठी शहरात आले होते. डॉ. दिनेश परदेशी यांची नगराध्यक्षपदी निवड झाल्याचे घोषित झाल्यानंतर त्यांचे समर्थक आणि मित्रपरिवाराने जल्लोष सुरू केला. डॉ.परदेशी यांच्या निवासस्थानासमोर गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी सुरू असताना आहेर हे देखील आपल्या मित्रांसह या मिरवणुकीत सहभागी झाले होते. सायंकाळी 4.30 च्या सुमारास मिरवणूक संपल्यानंतर आहेर यांना आपल्या गळ्यात सोन्याची साखळी नसल्याचे लक्षात आले.
भास्कर आहेर यांनी तातडीने सोपान म्हस्के आणि सुरेश राऊत या आपल्या सहकाऱ्यांसह आजूबाजूच्या परिसरात साखळीचा शोध घेतला. बराच वेळ शोध घेऊनही साखळी मिळून आली नाही, तेव्हा त्यांना खात्री पटली की गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात इसमाने ती लंपास केली आहे. चोरीला गेलेली सोन्याची साखळी साडेतीन तोळे वजनाची असल्याचे सांगण्यात आले.. आहेर यांनी तत्काळ वैजापूर पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. विजयाचा आनंद साजरा करत असताना कोणीतरी लबाडीच्या इराद्याने गळ्यातील दागिना लंपास केला. असे त्यांनी आपल्या जबाबात नमूद केले आहे.पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
0 Comments