news today, वैजापुरात 2 जागांसाठी 67.86 टक्के मतदान

वैजापूर, ता.20 -  नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 1 अ आणि 2 ब मधील प्रत्येकी एक अशा दोन जागांसाठी शनिवारी शांततेत मतदान पार पडले. एकूण 6 हजार 643 मतदारांपैकी 67.86 टक्के म्हणजेच 4 हजार 508 मतदारांनी मतदान केले. यात 2 हजार 272 महिला (67.08 टक्के) व 2 हजार 236 पुरुष असे एकूण (68.67 टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 
      
वैजापूर शहरातील लोकमान्य टिळक नगर परिषद प्राथमिक शाळा मतदान केंद्रास पोलीस अधिक्षक डॉ विनयकुमार राठोड यांनी भेट दिली.

दुपारी साडे तीन वाजेपर्यंत 46. 62 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पार पडल्याची माहिती निवडणूक विभागातर्फे देण्यात आली. प्रभाग क्रमांक 1 अ मध्ये 2 हजार 710 व प्रभाग क्रमांक 2 ब मध्ये 3 हजार 933 मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी दुपारी साडे तीन वाजेपर्यंत 46. 62 टक्के मतदान  झाले होते. या दोन जागांसाठी दोन महिलांसाह चार उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
     
निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अरुण जऱ्हाड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भागवत बिघोत व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 1 अ मधील एका जागेसाठी करुणा निकेतन शाळा, बाजारातळ येथील नगर परिषद प्राथमिक शाळा व ईदगाह परिसरातील डीपीईपी शाळा या तीन केंद्रावर मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बक्ष शेख सुमैय्या सोहेल व शिवसेनेच्या शेख मसिरा परवीन यांच्यात लढत झाली.
    
            विशाल संचेती                      सागर गुंड

तसेच प्रभाग क्रमांक 2 ब मधील एका जागेसाठी फुलेवाडी रस्त्यावरील, लोकमान्य टिळक शाळा,, जे. के. जाधव कॉलेज व न्यू हायस्कूल मधील दोन अशा चार केंद्रावर मतदान झाले. या जागेसाठी भाजपचे विशाल जीवनलाल संचेती व अपक्ष सागर बाबासाहेब गुंड यांच्यात थेट लढत झाली. पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस अधिक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी वैजापूरातील मतदान केंद्राना भेट देऊन बंदोबस्ताचा आढावा घेतला. दुपारी दोन वाजेनंतर मतदान प्रक्रिया वेगाने सुरु झाली कारण मतदार मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी घराबाहेर पडले. केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळी सहा वाजेनंतरही काही ठिकाणी मतदान सुरु होते.

Post a Comment

0 Comments