news yoday, वैजापुरात मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ; दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर होणार

एकाचवेळी होणार 12 प्रभागांची मतमोजणी...

वैजापूर, ता.20 - वैजापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षासह 25 नगरसेवकपदासाठी 2 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी रविवारी (ता.21) होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरु होणार असून 12 प्रभागांची एकाचवेळी मतमोजणी होणार असल्याने दुपारी 12 ते 12.30  वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर होणार आहेत.

येथील तहसील कार्यालयाच्या इमारतीत मतमोजणी होणार असून त्याची जय्यत तयारी प्रशासनाने केली असल्याची माहिती मुख्याधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी भागवत बिघोत यांनी दिली. मतमोजणीसाठी 12 प्रभागासाठी 12 टेबल असणार आहेत. या प्रत्येक टेबलवर 1 पर्यवेक्षक, 1 सहाय्यक व 1 शिपाई असे तीन कर्मचारी असतील. मतमोजणीसाठी एकूण 80 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभागनिहाय मतमोजणीच्या फेऱ्या होतील. प्रभागात जेवढे मतदान केंद्र असतील तेवढ्या फेऱ्या होतील. कमीत कमी तीन तर जास्तीत जास्त सात फेऱ्या होतील.

नगराध्यक्ष व नगरसेवकपदाची एकाचवेळी मतमोजणी होणार आहे. सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारी 12 ते 12.30 वाजेपर्यंत संपूर्ण मतमोजणी होईल. मतमोजणीसाठी प्रत्येक पक्षाच्या तसेच अपक्ष उमेदवारांसह त्यांच्या केवळ एक प्रतिनिधीला प्रवेश दिला जाणार आहे. निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड, सहायक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी भागवत बिघोत, अतिरिक्त निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार सुनील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही मतमोजणी पार पडणार आहे.
मतमोजणीसाठी पोलिस प्रशासनानेही शहरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.


















Post a Comment

0 Comments