सर्जा राजाला सजविण्यासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी
हसन सय्यद
------------------------
लोणी खुर्द, ता.20 - वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे बैलपोळ्याच्या सणानिमित्त आठवडी बाजारात शेतकऱ्यांची रेलचेल, बैलपोळ्यांचे साहित्य खरेदी करतांना अनेकांना चढ्या भावाने साहीत्य खरेदी करावे लागले.
बळीराजाला वर्षभर शेतात राबण्यासाठी मदत करणाऱ्या सर्जा- राजाचा पोळा सण यंदा शुक्रवार दि.२२ रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त लोणी खुर्दा येथील आठवडी बाजारामध्ये आपल्या लाडक्या सर्जा- राजाला सजवण्याकरिता साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.पोळा सणाच्या निमित्ताने बुधवारी आठवडी बाजारामध्ये सजावटीचे साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली होती. सर्जा-राजाला सजवण्यासाठी लागणारे इंगूळ, भोरकडी, पितळी शेंबी, चवरी, घुंगरू, कपाळ गोंडा, कवडी माळ, पैंजण, कासरा, वेसण गोंडे, बेगडी, म्होरकी, कासरा, चवरी आदी साहित्याने दुकाने सजली आहेत. आपल्या लाडक्या सर्जा- राजाला सजवण्यासाठी येथील बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.दरम्यान, यावर्षी अद्यापही समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. तरी देखील पोळा सणासाठी खरेदी करतांना शेतकऱ्यांमध्ये उत्साह जाणवत आहे. यंदा सजावट साहित्याच्या किमतीमध्ये २० ते ३० टक्के वाढ झाली आहे. तरी देखील काळ्या आईची इमाने इतबारे सेवा करणाऱ्या बैलांना सजवण्यासाठी शेतकरी आपापल्या आर्थिक कुवतीप्रमाणे साहित्य खरेदी करतांना दिसून आले.
यावर्षी अपेक्षित पाऊस पडला .म्हणून पोळा सणाच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या बजेटप्रमाणे पोळ्याच्या सजावट साहित्याची खरेदी केली. त्यामुळे चांगला व्यवसाय झाला. झाला असल्याचे मत व्यवसायिक चॉंद सैय्यद. यांनी सांगितले.
मातीच्या बैलजोडीला मोठी मागणी.....
पोळा सण साजरा करण्यासाठी घरोघरी मातीच्या बैलजोडीचे पूजन केले जाते. या मातीच्या बैलजोडीला मोठी मागणी असून, आकाराप्रमाणे पन्नास ते साठ रुपये किंमत आहे, अशी माहिती महीला व्यावसायिक कविता शंकर चव्हाण यांनी प्रतिनिधीशी बोलतांना दिली.
0 Comments