political news, वैजापुरात शिवसेना उबाठा पक्षाला खिंडार ; तालुकाप्रमुख सचिन वाणी यांच्यासह अनेकांचा शिंदे गटात प्रवेश ?

वैजापूर, ता.12 - नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात नगराध्यक्षपदावरून युतीत बिघाडी निर्माण झाली आहे. दरम्यान शिवसेना उबाठा पक्षाच्या तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला असून शिवसेना उबाठा पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन वाणी, शहरप्रमुख प्रकाश पाटील चव्हाण व माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी पाटील मिसाळ यांच्यासह कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची शहरात चर्चा आहे. या घडामोडींमुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार असून ठाकरे गटाला जागा सोडाव्या लागणार असल्याने नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

.    
       सचिन वाणी      मनाजी मिसाळ     प्रकाश चव्हाण

मिळालेल्या माहितीनुसार, नगरपालिका निवडणुकीत युती करण्यासंदर्भात शिवसेना शिंदे गट आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी स्वतंत्रपणे माजी आमदार स्व.आर.एम.वाणी यांच्या निवासस्थानी जाऊन शिवसेना उबाठा पक्षाचे तालुकाप्रमुख सचिन वाणी व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली व नगरपालिका निवडणुकीत युती करण्यासंदर्भात प्रस्ताव ठेवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

वाणी कुटुंबीय आणि शिवसेना उबाठा पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप व शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षांच्यावतीने आलेल्या प्रस्तावावर विचार करून 
भाजपच्या स्थानिक नेत्यांनी ठेवलेला पक्षात विलीन होण्याचा प्रस्ताव नाकारला. शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून शिवसेना उबाठाचे तालुकाप्रमुख सचिन वाणी, शहरप्रमुख प्रकाश पाटील चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी पाटील मिसाळ यांच्यासह अन्य काही कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे समजते.

यासंदर्भात शिवसेना उबाठा पक्षाचे तालुकाप्रमुख सचिन वाणी, शहराध्यक्ष प्रकाश चव्हाण व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनाजी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटाबरोबर गेल्यास तालुक्यात शिवसेना उबाठा पक्षाला मोठे खिंडार पडणार असून नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकतील असे चित्र सध्या निर्माण झाले आहे.








Post a Comment

0 Comments