news today, भाविकांच्या ट्रॅक्टरला अपघात ; पिनाकेश्र्वर घाटातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

महादेव मंदीर डोंगरावरुन दोनशे फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला ; दोन ठार तर 13 जण जखमी

मृतांमध्ये कन्नड व जनेफल येथील महिलांचा समावेश

हसन सैय्यद 
-----------------------
लोणी खुर्द ता.18-  नांदगाव तालुक्यातील जातेगावजवळ असलेल्या पिनाकेश्वर महादेव घाटात एक भीषण अपघात घडला आहे. रविवारी (17 ऑगस्ट) सायंकाळी पाचच्या सुमारास मंदिराचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांची ट्रॅक्टर-ट्रॉली सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला असून,13 भाविक जखमी झाले आहेत. या घटनेमुळे  पिनाकेश्र्वर घाटातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अपघातात कांताबाई नारायण गायके (वय 56, रा. खामगाव, ता. कन्नड) आणि कमलबाई शामराव जगदाळे (वय 62, रा. जानेफळ, ता. वैजापूर) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याव्यतिरिक्त, चेतन प्रकाश कवडे, प्रणिता प्रकाश कवडे, माया प्रकाश कवडे, अप्पा सोपान राऊत, श्रावणी अप्पा राऊत, कल्याणी राजेंद्र कवडे, साई कवडे, प्रगती सोमनाथ नवले, आणि आदित्य योगेश कवडे हे भाविक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला आणि शरीराच्या इतर भागांना मार लागला आहे.

जखमींना तातडीने बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आणि पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. अपघात घडल्यानंतर, प्रत्यक्षदर्शी भाविक आणि पर्यटकांनी धाडस दाखवून दरीत उतरून जखमींना बाहेर काढले आणि त्यांना स्वतःच्या वाहनांतून रुग्णालयात पोहोचवले. स्थानिकांच्या या तत्पर मदतीमुळे अनेक जीव वाचले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलीस हवालदार भास्कर बस्ते, पोलीस शिपाई परमेश्वर श्रीखंडे, होमगार्ड ऋषिकेश पठाडे, आणि गणेश इप्पर यांनी मदतकार्यात सहभाग घेतला. मागील चार दिवसांत याच घाटात झालेला हा दुसरा अपघात आहे. त्यामुळे, पिनाकेश्वर घाटातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Post a Comment

0 Comments