news today, आग लागून ऊसतोड मजुराची झोपडी खाक ; जिवाची पर्वा न करता आईने बाळाला वाचवले...

ताराचंद वेळंजकर
-------------------------------
 खंडाळा, ता .30 - वैजापूर तालुक्यातील खंडाळा शिवारातील गट क्रमांक 589 (गायरान) मधील एका ऊसतोड मजुराच्या झोपडीला आग लागून या आगीत झोपडी जळून खाक झाली. आईने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे झोळीत झोपलेले तीन महिन्याचे बाळ मात्र वाचले. उचल घेतलेली रोख रक्कम व संसारोपयोगी साहित्य या घटनेत जळून ऊसतोड मजुराचे कुटुंब उघड्यावर आले. आगीत मोठे नुकसान झाले मात्र, बाळ वाचल्याचा आनंद झाला. झोपडीला आग लागल्याची लक्षात आल्यानंतर आईने आगीची कुठलीही परवा न करता झोळीत झोपलेल्या बाळाला बाहेर काढले. 

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजी कारभारी सोनवणे यांच्या झोपडीला शनिवार दिनांक 28 रोजी आग लागून या आगीत ऊस तोडणीसाठी आणलेले उचल 2,22,700 (दोन लाख 22 हजार 700 रुपये) रोख रक्कम व घरातील जीवनावश्यक असलेल्या संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. अज्ञात कारणाने लागलेल्या आगीत पाचट, गवत व मातीच्या भिंतांनी तयार केलेली झोपडी पूर्णतः जळून खाक झाली.  मात्र, प्रसंगावधानामुळे यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

खंडाळा सजाचे तलाठी सुखदेव राठोड यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला. या घटनेत शिवाजी कारभारी सोनवणे यांचा संसार उघड्यावर आला  असून फक्त अंगावरील कपडे शिल्लक राहिले आहे. प्रशासनाने  या घटनेची दखल घेऊन नुकसान झालेल्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी होत आहे.
खंडाळा ग्रामपंचायत कार्यालयानेही पुढाकार घेऊन शिवाजी सोनवणे यांना घरकुल योजनेतून घरकुल तयार करून द्यावे अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे

Post a Comment

0 Comments