रुपाली चाकणकरांना समन्स ...
नाशिक, ता. 30 - भविष्य सांगण्याच्या नावाखाली महिलांवर अत्याचार करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात याचे राजकीय साथीदार आता रडारवर आले आहेत. त्यांच्या एजंटांची चौकशी करण्याची तयारी सुरू झाली असून राष्ट्रवादी काँग्रसच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना समन्स बजावून चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे. दरम्यान, अशोक खरातची पोलिस कोठडी 1 एप्रिलपर्यंत वाढविली आहे.
भोंदू बाबा अशोक खरात याला रविवारी (ता.29) न्यायालयात हजर करण्यात आले. तो तपासात सहकार्य करीत नसल्याने अधिक माहिती घेण्यासाठी वेळ हवा आहे, त्याचे फोन कॉल डिटेल्स काढण्यात आले आहेत. कोडवर्डने सेव्ह केलेल्या नंबरच्या व्यक्तींची नावे समोर आणायची आहेत, मालमत्ता, आर्थिक व्यवहार, फसवणूक व अत्याचाराला बळी पडल्याची आणखी प्रकरणे शोधायची आहेत, त्यासाठी पोलिस कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी सरकारी वकिलांनी न्यायालयात केली. न्यायालयाने खरातच्या पोलिस कोठडीत 1 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.
भूरळ घालून अत्याचार...
मानसशास्त्रीय पद्धतीने खरात महिलांचा विश्वास संपादन करायचा. ' पतीला क्षमतेची व सुंदरतेची जाणीव नाही, कदर नाही' असे सांगून तो महिलांना आपलेसे करून जाळ्यात ओढायचा. पती - पत्नीत वितुष्ट निर्माण करून महिलांना आपल्या वासनेची शिकार करायचा, असे विशेष तपास पथकाच्या चौकशीत समोर आले आहे.
रुपाली चाकणकर यांना समन्स ...
राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना हजर राहण्याचे पत्र देण्यात आले आहे. त्यांची कुठे व केंव्हा चौकशी होईल याची निश्चित माहिती समोर येऊ शकली नाही.
दीपक केसरकरांसह काही आमदारांचीही चौकशी होणार
खरातच्या मिरगाव येथील महादेव मंदिरात, नाशिक कार्यालयात आणि बंगल्यावर अनेक अधिकारी, नेते, मंत्री, आमदार, नगरसेवक यांचा वावर होता.अनेकांनी त्याच्याकडे पूजाविधीही केले. त्यांच्या प्रभावाने अनेक जण खरातचे बळी ठरले. यासर्वाना चौकशीसाठी बोलाविण्याची तयारी एसआयटी ने केली आहे. माजी मंत्री दीपक केसरकर यांना चौकशीसाठी बोलविणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली काही आमदारांसह लोकप्रतिनिधींनाही चौकशीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
0 Comments