गणेश विसर्जनासाठी पोलीस प्रशासन व नगरपालिकेची जय्यत तयारी ; तगडा पोलीस बंदोबस्त...
वैजापूर, ता.06/ प्रतिनिधी - शहर व ग्रामीण भागात गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत व सुरळीत पोलीस व प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.
गणेश विसर्जन मिरवणूक निर्विघ्न पार पडण्यासाठी येथील पोलिस प्रशासन, पालिका प्रशासन, महसूल विभाग व महावितरणाचे असे एकूण १७९ कर्मचाऱ्यांचा जंबो फौजफाटा तैनात राहणार असून यात राज्य राखीव दलाची एक तुकडीचा देखील समावेश आहे.
यंदा शहरात एकूण ५६ गणेश मंडळांनी श्रींची स्थापना केली असून विसर्जन मिरवणूक निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनातील उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, ०६ पोलिस उपनिरीक्षक, ६१ पोलिस कर्मचारी, तर राज्य राखीव दलाची २४ जवानांची एक तुकडी तर २८ गृहरक्षक दलाचे जवान असे एकूण १२२ अधिकारी व कर्मचारी सज्ज राहणार आहेत. याशिवाय महावितरणाचे उपकार्यकरी अभियंता, ०३ सहायक अभियंता व १८ कर्मचारी असे एकूण २२ अधिकारी व कर्मचारी तर उपविभागीय अधिकाऱ्यासह तहसीलदार व त्यांचे पथक देखील तैनात राहणार आहे. याशिवाय विसर्जन मार्ग ते विसर्जन स्थळापर्यँत वैजापूर नगरपालिकेचे एकूण ३२ कर्मचारी तैनात राहणार आहेत.
विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी सिस्टीमला मनाई असून यंदाच्या मिरवणुकीत ध्वनीमापक यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून विसर्जन मिरवणुकीस सुरुवात होणार असून महाराणा प्रताप रोड - भाजी मंडई रोड - टिळक रोड - जामा मस्जिद- पाटील गल्ली ते शासकीय विहिरीवर मिरवणुकीतील श्रींच्या मुर्तींचे विसर्जन होणार आहे. गणेश मंडळाना रात्री बारा वाजेपर्यंत श्रींच्या विसर्जन मिरवणुकीसाठी परवानगी देण्यात आली आहे.
0 Comments