news today, श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेची प्रलंबित प्रकरणे निकाली काढा - राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

वैजापूर, ता.11/प्रतिनिधी - वैजापूर तालुक्यातील श्रावण बाळ योजना व संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत सुमारे तीन हजार प्रस्ताव मागील काही महिन्यांपासून प्रलंबित आहेत. या प्रस्तावास मंजुरी द्यावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा तालुका गटनेते विशाल शेळके यांनी  अप्पर जिल्हाधिकारी संभाजी अडकूने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. श्री.अडकुने यांनी या निवेदनाची तत्काळ दखल घेत दूरध्वनीद्वारे तहसीलदार सुनील सावंत यांच्याशी संपर्क साधून श्रावण बाळ व राजीव गांधी निराधार योजनेची प्रलंबित प्रकरणे निकाली काढा अशी सूचना केली. 
              
निवेदनात म्हटले आहे की, श्रावण बाळ योजना व संजय गांधी निराधार अनुदान योजनांचा उद्देश वयोवृद्ध,अपंग, निराधार, परितक्ता व विधवा लाभार्थ्यांना नियमित आर्थिक सहाय्य पुरविणे हा असून,अनेक लाभार्थ्यांना हे सहाय्य मिळत नसल्याने ते अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत. सदरील प्रस्ताव मंजूर व्हावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 14 ऑगस्ट 2025 रोजी भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी योग्य प्रस्ताव मंजूर करण्याबाबत निर्देश देण्याचे 
आश्वासन दिले होते. 
 
वैजापूर तालुक्यातील  लाभार्थ्यांमध्ये अनेक जण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपले जीवन जगत असून, त्यांना शासनाच्या या योजनांअंतर्गत नियमित आर्थिक सहाय्य मिळणे अत्यावश्यक आहे. सदरील प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.जे प्रस्ताव नियमात बसत आहे असे प्रस्ताव मंजूर करण्यात यावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने उपविभागीय डॉ.अरुण जऱ्हाड यांना भेटून निवेदन ही दिले होते परंतु अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. यासाठी लाभार्थ्यांना न्याय मिळाला म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या माध्यमातून  सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे असे श्री.शेळके यांनी निवेदनात म्हटले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैजापूर विधानसभा अध्यक्ष तथा माजी सभापती एल.एम.पवार, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बागुल, जिल्हा उपाध्यक्ष जगदीश पवार आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments